कोरोना महामारीनंतर लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये वाढ !
|
पणजी, १७ एप्रिल (वार्ता.) – कोरोना महामारीनंतर लहान मुलांमधील मानसिक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक विद्यालयामध्ये समुपदेशक (कौन्सिलर) नेमावे, अशी शिफारस गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने केली आहे. सध्या गोवा शैक्षणिक विकास महामंडळाच्या वतीने एका योजनेच्या अंतर्गत २९५ विद्यालयांसाठी ८५ समुपदेशक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले,
‘‘विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य, चिंता, शाळेत न जाणे, ‘गेमिंग डिसऑर्डर’ (सतत भ्रमणभाषवरील गेम खेळत बसणे), नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होणे, पालकांसमवेत संघर्ष करणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा (भ्रमणभाष, लॅपटॉप आदी) मोठ्या प्रमाणावर वापर करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, शिकण्यामध्ये समस्या निर्माण होणे, अयोग्य वागणे आदी समस्यांमध्ये हल्ली वाढ झाली आहे. पालटलेली जीवनशैली, मुलांची योग्य प्रमाणात वाढ न होणे, आधुनिक तंत्रज्ञान, विभक्त कुटुंब, मुलांना मागदर्शन न मिळणे आदी कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मुले शाळांमध्ये सर्वाधिक वेळ घालवत असल्याने त्यांच्यासमवेत समुपदेशकाने (कौन्सिलरने) योग्य संवाद साधल्यास ही समस्या सुटू शकते.’’
संपादकीय भूमिका
|