पुणे येथील भंगारात निघणार्या जुन्या सरकारी वाहनांची संख्या ६० टक्क्यांनी अल्प !
पुणे – शहरातील सर्व सरकारी कार्यालयांतील १५ वर्षांपुढील वाहने भंगारामध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाहनांची सर्व माहिती ३१ मार्चपर्यंत ऑनलाईन भरण्यास सर्व विभागांना सांगण्यात आले होते. प्रारंभी या वाहनांचा आकडा अनुमाने २ सहस्र होता; परंतु प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर हा आकडा ६० टक्क्यांनी न्यून होऊन केवळ ८५६ वाहनेच भंगारामध्ये काढली जातील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आर्.टी.ओ.) सूत्रांनी दिली आहे.
कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की,…
१. अनेक सरकारी विभागांनी त्यांच्याकडील वाहनांची आधीच विल्हेवाट लावली आहे; परंतु या वाहनांची नोंद वाहनप्रणालीवर झालेली नव्हती. तसेच अनेक सरकारी कार्यालयांनी त्यांच्याकडील जुन्या वाहनांची विक्री केलेली आहे, त्याचीही नोंद वाहन प्रणालीमध्ये केलेली नाही. त्यामुळे प्रारंभी जुन्या वाहनांची संख्या अधिक दिसून येत होती.
२. प्रत्यक्षात पहाणी केल्यानंतर ही संख्या अल्प झाली असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले.
३. जुन्या वाहनांच्या विक्रीसाठी वेगळे संकेतस्थळ निर्माण केले आहे. त्यावर प्रत्येक वाहनाचे छायाचित्र, त्याचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक आदी तपशीलही भरावा लागणार आहे.