पती-पत्नी यांच्यातील मतभेद : २१ व्या शतकातील गंभीर समस्या !

१. पती-पत्नी यांच्यातील मतभेदामागील कारणे

अ. समाजाची पालटलेली मानसिकता : ‘काही पती आणि पत्नी यांचे स्वभाव निराळे असतात. त्यामुळे एकमेकांचे विचार पटत असतील, तरच एकत्र रहावे. अन्यथा वेगळे व्हावे’, अशी संकल्पना समाजात रूजत आहे.

आ. मुलींची उच्च शैक्षणिक पात्रता : आज मुली उच्चशिक्षित होऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहेत. त्यामुळे ‘आता मी सक्षम आहे, तर मी का सहन करायचे ?’, असे मुलींचे म्हणणे असते.

इ. पालटलेली जीवनशैली : तरुण पिढीकडून सामाजिक माध्यमांचा अतिरेकी वापर होत आहे. त्यामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. त्यांच्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा पालटत चाललेल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य हवे आहे आणि स्वतःमध्ये पालट करण्याची अजिबात सिद्धता नाही.

ई. पती आणि पत्नी यांच्यातील हरवलेला संवाद : दूरचित्रवाहिनी, भ्रमणध्वनीसंच, तसेच व्हॉटस्ॲप आणि फेसबुक यांच्यामुळे पती-पत्नी यांचा एकमेकांशी संवाद अल्प झाला आहे. काही पती आणि पत्नी यांचा केवळ भ्रमणध्वनीसंचावरच व्यावहारिक संवाद होतो. तसेच हे माध्यम त्यांच्यातील वाद वाढण्यासाठी कारणीभूत होतात.

उ. पत्नीच्या माहेरकडील नातेवाइकांचा हस्तक्षेप : मुलीच्या सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाल्या पाहिजेत, यासाठी तिच्या आई-वडिलांकडून हस्तक्षेप होतो. लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून लांब जाऊ नये; म्हणून मुलाचे आई-वडील त्याच्या संसारात सतत लक्ष घालत असतात.

ऊ. पती-पत्नी यांच्यातील अहंकार : पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कुणी कुणाचे ऐकायचे ? असा प्रश्न निर्माण होतो. ‘स्वत: न पालटता दुसर्‍याने पालटावे’, अशी अहंकारी भावना दोघांतही असते.  त्यामुळे त्यांच्यात तणाव निर्माण होतो.

ए. अन्य कारणे : एकमेकांविषयी अपसमज, संशय, व्यसन, दुसर्‍याला त्रासदायक असणार्‍या सवयी, शारीरिक आणि मानसिक आजार आदी कारणांमुळेही पती-पत्नी यांच्या नात्यांमध्ये वितुष्टता निर्माण होते.

२. कुटुंब टिकवण्यासाठी उपाययोजना

‘मेड फॉर इच अदर’ (आपण एकमेकांसाठी बनलो आहोत) या केवळ कल्पनेतील गोष्टी असतात. वास्तविक तसे अवघड आणि अशक्य आहे. त्याऐवजी ‘मोल्ड फॉर इच अदर’ (एकमेकांसाठी तडजोडीने वागणे) करायचे ठरवले, तर कुटुंब टिकू शकते.

अ. मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे, तसेच ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्या योग्य शब्दांत मनमोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे.

आ. सूडभावना टाळावी ! : पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांशी सूड भावनेने वागू नये, उदा. ‘तू माझ्या आई-वडील किंवा नातेवाइक यांच्याशी नीट बोलला नाही. त्यामुळे आता मीही तुझे आई-वडील किंवा नातेवाइक यांच्याशी चांगली वागणार नाही’, अशी भावना असू नये.

इ. परिस्थिती स्वीकारा ! : अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही, तरीही किरकोळ मतभेद आणि दोष यांच्यासह आपल्याला त्याला स्वीकारता येईल का ? हा विचार प्राधान्याने करावा.

ई. स्वत:मध्ये पालट करण्याची सिद्धता हवी ! : ‘मीच का पालटायचे ?’, हा अहंकार बाजूला ठेवून नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्येच पालट करण्याची सिद्धता दाखवावी.

उ. उत्तरदायित्वाची जाणीव ठेवा ! : लग्न झाल्यानंतर येणार्‍या उत्तरदायित्वांची  जाणीव आणि ती निभावण्याची सिद्धता ठेवावी. तसेच आपल्या भूमिका आणि दृष्टीकोन यांमध्ये पालट करावा.

ऊ. तडजोडीची सिद्धता हवी ! : कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतच असतात; पण तो किती ताणायचा, हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली, तर हे वाद टोकाला जात नाहीत.

थोडक्यात आपल्याला हवे तसे सर्व कधीच मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले, तर कौटुंबिक नाती टिकवणे अशक्य नाही.’

जीवनातील प्रत्येक समस्येकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक, तसेच एकमेकांची सहकार्याची भावना साध्य करण्यासाठी व्यक्तीची सदसद्विवेकबुद्धी जागृत असणे आवश्यक आहे. कुटुंबव्यवस्था टिकण्यासाठी साधना करणेच अपरिहार्य आहे ! – संपादक

– प्रा. किरण पाटील, मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशक

(साभार : सामाजिक माध्यम)