सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत समावेश !
सातारा, १७ एप्रिल (वार्ता.) – आय.यु.सी.एन्. या जागतिक संस्थेच्या मानकानुसार देशातील प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाचे ४ वर्षांतून एकदा मूल्यांकन होते. यापूर्वी वर्ष २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये मूल्यांकन झाले. वर्ष २०२२ मध्ये झालेल्या मूल्यांकनानुसार पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत आले आहे.
वर्ष २०१८ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ६०.१६ प्रतिशत गुण मिळवून ३७ व्या स्थानावर होता; मात्र वर्ष २०२२ मध्ये क्षेत्रीय व्यवस्थापन केलेल्या अत्यंत परिणामकारक पालटामुळे प्रकल्पाने ‘पुष्कळ चांगले’ या श्रेणीत क्रमांक पटकावला. देशातील जवळपास २० व्याघ्र प्रकल्प याच श्रेणीत असून ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, काझिरंगा, कॉर्बेट, सुंदरबन, पन्ना आणि बांधवगढ यांची नावे प्राधान्याने घ्यावी लागतील. ९ एप्रिल या दिवशी ‘व्याघ्र प्रकल्पाची ५० वर्षे’ या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पंतप्रधानांनी वर्ष २०२२ मधील प्रगणनेनुसार वाघांची आकडेवारी घोषित केली. या आकडेवारीनुसार भारतात सध्या ३ सहस्र १६७ वाघांची नोंद करण्यात आली आहे.
‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’ने व्यवस्थापनामध्ये केलेले काही परिणामकारक पालट
१. वन संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षणकुटी, निरीक्षण मनोरे, वायरलेस अद्ययावत् केले.
२. कोअर आणि बफर क्षेत्रातील २०० किलोमीटरहून अधिक संरक्षण रस्त्यांची निर्मिती आणि डागडुजी केली.
३. अखाद्य वनस्पतींचे निर्मूलन करून ५ सहस्रांहून अधिक हेक्टरवर गवत कुरणांचे व्यवस्थापन केले आहे.
४. वन गुन्ह्यांवर प्रभावी कार्यवाही करून नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे.
५. बफर क्षेत्रातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
६. विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आले.