मनाला साधनेची ओढ लागल्यावर तळमळीने साधना करणार्‍या आणि सेवा करायला शिकून केवळ एक ते दीड वर्षात समष्टी साधना करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. पूजा परशुराम पाटील (वय ५० वर्षे) !

सौ. पूजा परशुराम पाटील यांचे यजमान श्री. परशुराम पाटील हे सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत असून ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी रहातात. त्यांची पत्नी सौ. पूजा आरंभी साधना म्हणून कर्मकांड करायच्या. दळणवळण बंदी चालू झाल्यावर त्यांना सनातन संस्था सांगत असलेली साधना करण्याची ओढ निर्माण झाली. त्या समवेत त्यांची सेवा करण्याची तळमळही वाढली. सेवा करता येण्यासाठी त्यांना सेवेच्या संदर्भातील अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. त्यांनी त्या गोष्टी शिकून घेऊन तळमळीने सेवा केली. त्यांच्यातील तळमळ आणि भाव सगळ्यांनी शिकण्यासारखा आहे. श्री. परशुराम पाटील यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

१७.४.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण सौ. पूजा पाटील यांची शिकण्याची वृत्ती आणि साधनेची तळमळ पाहिली. आजच्या लेखात आपण त्यांच्यात सर्वांप्रती असणार्‍या भावाविषयीची सूत्रे पहाणार आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/674084.html

सौ. पूजा परशुराम पाटील

३. मुलांवर चांगले संस्कार करणे

३ अ. मुलांवर त्यागाचे संस्कार करणे : तिने घरीच एक अर्पण पेटी ठेवली आहे. मुलांना अर्पणाचे महत्त्व सांगून तिने शिक्षणासाठी लागणारे साहित्य आणल्यावर शिल्लक राहिलेले पैसे ती त्यांच्याकडून अर्पण पेटीत घालून घ्यायची. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ती त्या अर्पण पेटीतील पैसे अर्पण करते.

३ आ. मुलांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवणे : आमचा मोठा मुलगा सूरज काही दिवस आश्रमात राहून सेवा करत होता. काही कालावधीनंतर त्याला चांगल्या आस्थापनात नोकरी लागली; पण पत्नीला त्याला नोकरी लागल्याचा आनंद झाला नव्हता. ‘तू आश्रमात राहून साधना कर’, असे ती त्याला सांगते.

श्री. परशुराम पाटील

४. पत्नीची यजमानांकडून कुठल्याही साहाय्य करण्याच्या अपेक्षा नसणे, ‘यजमान आश्रमात सेवा करत असल्यामुळे देवाच्या कृपेने घरी कसल्याही अडचणी येत नाहीत’, असा तिचा भाव असणे 

तिने माझ्याकडून कधीच कसलीही अपेक्षा केली नाही. ‘तुम्ही घरी या, मला वेळ द्या किंवा घरातील कामात मला साहाय्य करा’, असे ती कधीच सांगत नाही. ती घरातील सगळी कामे स्वतःच करते. ती मला म्हणते, ‘‘तुम्ही आश्रमात देवाची सेवा करता, तर त्याचे फळ मलाही मिळणार आहे. तुम्ही तिकडे अधिकाधिक सेवा करा. तुम्ही आश्रमात सेवा करत असल्यामुळे घरी काही अडचण येत नाही.’’ तिला तशा अनुभूतीही यायच्या.

५. ‘देव कधीही कुठल्याही माध्यमातून परीक्षा घेईल; म्हणून घरी येणार्‍या सर्वांचा योग्य पाहुणचार करणे

घरी कुणी साधक आल्यावर ‘हे आपल्या श्री गुरूंचेच रूप आहे’, या भावानेच ती त्यांचा पाहुणचार करते. ‘देव कुणाच्या रूपात कधी येईल ?’, हे आपल्याला सांगता येत नाही. घरी पाळीव प्राणी आहेत. त्यांना ती वेळेत खायला घालते. दुसर्‍यांच्या घरातील प्राणी भूक लागल्यावर ओरडत आल्यावर ती त्यांनाही खायला देते. अशा वेळी ती म्हणते, ‘‘देव कुणाच्या माध्यमातून येईल आणि आपली परीक्षा घेईल ?’, ते आपल्याला ठाऊक नाही.’’ मला तिच्याकडून ‘चराचरात भगवंत कसा बघायचा ?’, हे शिकायला मिळाले.’

६. भाव

६ अ. ‘कृतीला कशा प्रकारे भाव जोडायचा ?’, हे पत्नीकडून शिकायला मिळणे

६ अ १. घराला श्री गुरूंचा आश्रम समजून वागणे : ती घरातील सर्व कामे करतांना ‘हा श्री गुरूंचा आश्रम आहे’, असा भाव ठेवून आणि आश्रमातील सेवा समजून करते.

६ अ २. दारात रांगोळी काढतांना ‘प्रत्येक पायरीवर सनातनच्या तीन गुरूंचे चरण काढत आहे’, असा भाव ठेवणे : दारात रांगोळी काढतांना तिचा भाव फार सुंदर असतो. पहिल्या पायरीवर ती परात्पर गुरु डॉक्टरांचे, दुसर्‍या पायरीवर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे, तर तिसर्‍या पायरीवर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे चरण काढते.

६ अ ३. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघींच्या मध्ये स्वतः झोपत आहे’, असा भाव ठेवणे : ती रात्री झोपतांना तिच्या एका बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि दुसर्‍या बाजूला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या झोपल्या असून ती त्यांच्यामध्ये झोपली आहे’, असा भाव ठेवून झोपते. त्या वेळी ‘त्या दोघी तिला जवळ घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवतात’, असे तिला जाणवते.

६ आ. देवाविषयीचा भाव : आरंभी घरातील काही वस्तू खरेदी केल्यानंतर पत्नी त्यावर स्वतःचे किंवा मुलांचे नाव लिहायची. आता ती त्या वस्तूंवर देवाची नावे लिहू लागली आहे; कारण आता ‘सर्वकाही देवाचे आहे’, असा तिचा भाव असतो.

६ इ. संतांविषयी असलेला भाव

६ इ १. कन्नड भाषा समजत नसतांनाही ‘संतांच्या वाणीतील चैतन्य मिळून आध्यात्मिक लाभ होईल’, या भावाने कन्नड सत्संग ऐकणे : आमच्या कुटुंबातील सर्व जण कर्नाटक राज्यामध्ये रहात असल्यामुळे तेथील उत्तरदायी साधक पूजाला सांगायचे, ‘‘तुम्ही पू. रमानंदअण्णा यांचे कन्नड सत्संग ऐकू शकता. त्यानंतर ती लगेच त्यांचे सत्संग जोडून ऐकायची. ती मराठी भाषिक असल्यामुळे तिला त्या सत्संगातील भाषा समजत नव्हती, तरी कन्नड सत्संग ऐकतांना ‘आज्ञापालन म्हणून संतांचे सत्संग ऐकूया. सत्संग ऐकल्यामुळे मला त्यांच्या वाणीतील चैतन्य मिळणार आहे’, असा तिचा भाव असतो.

६ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला भाव

६ ई १. ‘रामनाथीहून आणलेला प्रसाद शेजारी रहाणार्‍या साधकांना देणे, ‘त्यांनाही श्री गुरूंचे चैतन्य मिळून त्याची साधना चांगली व्हावी’, असा पत्नीचा भाव असणे : मी रामनाथीहून घरी जातांना प्रसाद घेऊन जायचो. आमच्या घराशेजारी साधकांची घरे आहेत. पत्नी तो प्रसाद प्रत्येक साधकाच्या घरी देते. त्या वेळी ‘यातून त्यांना श्री गुरूंचे चैतन्य मिळून साधकांवरील आवरण निघून जाऊ दे आणि त्यांची साधना चांगली होऊ दे’, असा तिचा भाव असतो.

६ ई २. रामनाथी आश्रमातील पाणी घरी नेल्यावर ‘ते श्री गुरुचरणांचे तीर्थ आहे’, असा भाव असणे : मी रामनाथी आश्रमातून घरी जातांना प्रवासात पिण्यासाठी बाटलीतून पाणी भरून घ्यायचो. ते पाणी उरले, तर पत्नी म्हणायची, ‘हे श्री गुरूंच्या चरणांचे तीर्थ आहे.’ या भावाने ती ते पाणी घरातील सर्व पाण्यामध्ये मिसळायची आणि त्याच तीर्थाने घराची शुद्धी करायची. असे केल्यावर तिला घरात पुष्कळ उत्साह जाणवायचा.

७. पत्नीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष पाहिलेले नसणे, तरी ‘तिचा त्यांच्याविषयी पुष्कळ भाव असणे’, हे फार आश्चर्यकारक असणे

साधनेत यायच्या आधी ती कर्मकांडानुसार साधना करायची. तिच्यामध्ये हा पालट गेल्या एक ते दीड वर्षामध्येच झाला आहे. तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के घोषित करून परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्या कुटुंबासाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आम्हाला दिली. तेव्हा मला भरून आले. ‘मी देवाचे थोडे करते; पण देवाने मला भरभरून दिले आहे’, असा ती विचार करते. खरेतर तिने परात्पर गुरु डॉक्टरांना ना कधी पाहिले आहे, ना कधी ती त्यांच्याशी बोलली आहे. असे असूनही ‘एवढा भाव ठेवून साधना करणे’, हे किती कठीण आहे ! मी वर्ष २००० मध्ये साधना चालू केली आणि मला या स्थितीपर्यंत पोचायला २० वर्षे लागली. ‘तिने केवळ एक ते दीड वर्षात ही स्थिती गाठली’, याचे मला कौतुक वाटते.’

(समाप्त)

– श्री. परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक