कीर्तन आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !
सध्या वाढदिवस, पुण्यस्मरण इत्यादी कार्यक्रमांना कीर्तनाचे आयोजन केले जाते. या कीर्तनात कीर्तनकार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ओव्या यांवर भावपूर्ण विश्लेषण न करता राजकारण, चित्रपटातील गाणी आणि प्रसंग यांवर टीका-टिपणी, चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर भजने म्हणणे आणि विचित्र अंगविक्षेप करून नाचणे, बोलणे करतात. त्यामुळे ते कीर्तन न रहाता एखादा ‘कॉमेडी शो’ (विनोदाचा कार्यक्रम) होतो, तसेच घरातील सासू-सुनेचे भांडण, तत्सम प्रसंग यांवर आध्यात्मिक दृष्टीकोन देण्याऐवजी त्याला धरून विनोद करण्यात कीर्तनाचा अमूल्य वेळ वाया घालवतात. असे केल्याने समाज कीर्तनाच्या माध्यमातून अंतर्मुख होण्याऐवजी बहिर्मुखतेकडे जातो.
तसे पाहिले, तर ‘हरिपाठ’, ‘अभंग’ यांवर अभ्यासपूर्ण कीर्तन केले, तर श्रोते घंटोन्घंटे श्रवण करू शकतात; पण तसा दृष्टीकोन काही कीर्तनकारांना नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्येक अभंगात ‘जीव’ हा ‘शिवाशी’ कसा जोडला जाऊ शकतो, हे अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितले आहे. भरपूर काही करण्यापेक्षा मोजके करा; पण ते देवाच्या चरणांपर्यंत पोचेल असे करा. त्याच्यातून तुमचा आध्यात्मिक उत्कर्ष लवकर साधला जाईल. ‘इवलेसे रोप लावियेलें द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी’ यातही ते परमात्म्याशी अनुसंधान कशा प्रकारे साधले गेले, हेच सांगतात. संत तुकाराम महाराजही त्यांच्या अभंगात ‘पर्यावरणाचा समतोल’, ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ यांचा समतोल कसा राखावा ? यांविषयी सांगतात. भागवत, रामायण, अभंग यांवर संतांचे इतके सुंदर असे लिखाण असतांना बाहेरील व्यावहारिक, राजकीय उदाहरणे सांगण्याची काहीच आवश्यकता नसते. असे केल्याने संतांना जे सांगायचे आहे, ते जसेच्या तसे समाजापर्यंत जाऊन त्या लिखाणातील चैतन्य टिकून राहील आणि आबालवृद्ध, तरुण सर्व प्रकारचा श्रोतावर्ग कीर्तनाकडे आकृष्ट होईल.
संत सखाराम महाराज, पू. रमेश भाई ओझा, पू. किरीटभाई हे जेव्हा भागवत कीर्तन करायचे, तेव्हा श्रोते घंटोन्घंटे श्रवण करायचे; पण आता काही नवीन युवा कीर्तनकार आहेत ज्यांनी कीर्तनाचे बाजारीकरण करून त्यातील चैतन्य अल्प केले आहे. सध्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कीर्तनकारांमध्ये स्पर्धा पहायला मिळते, हे पुढील पिढीसाठी आदर्श व्रत नाही. त्यामुळे कीर्तन हे आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !
– श्री. जयेश बोरसे, पुणे