सातारा येथील राधिका चौकातील नवीन रस्त्याला भगदाड !
ठेकेदारावर निकृष्ट प्रतीचे काम करत असल्याचा आरोप
सातारा, १७ एप्रिल (वार्ता.) – येथील राधिका चित्रपटगृहाजवळ असणार्या आणि नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याला भगदाड पडले आहे. यामुळे ठेकेदाराच्या निकृष्ट प्रतीच्या कामाचा अनुभव सातारावासियांना पहायला मिळत आहे. भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातार्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट प्रतीची होत असल्याचा आरोप केला होता. यानिमित्ताने या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. संबंधित ठेकेदारावर सातारा नगरपालिका प्रशासन कोणती कारवाई करणार ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (निकृष्ट रस्त्यामुळे ठेकेदारावर कारवाईसाठी नागरिकांना वाट का पहावी लागते ? प्रशासनाने चौकशी करून तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)
सातारा शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली होती. यामध्ये राजवाडा ते समर्थ मंदिर हे काम पूर्ण करण्यात आले. नंतर मोती चौक ते राधिका चित्रपटगृह, महावितरण कार्यालय ते जुना मोटर स्टँड परिसर या अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. भुयारी गटार योजनेची कामे रखडल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यामुळे प्रतापगंज पेठेतील नागरिकांनी आंदोलनाची चेतावणी दिली होती. यामुळे ठेकेदाराने तात्काळ मोती चौक ते राधिका चित्रपटगृह या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले. काही दिवसांतच हे काम पूर्ण झाले; मात्र हे काम निकृष्ट प्रतीचे झाल्याचे नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आले. काम होऊन काही दिवसच लोटले असता राधिका चौकतील रस्त्याला मधोमध ६ इंच व्यासाचे भगदाड पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले, तसेच ६ फूट लांबीचा रस्ता या ठिकाणी खचला असून एखादे अवजड वाहन रस्त्यावरून गेल्यास रस्ता पूर्णपणे खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर पालिका प्रशासनाकडून कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.