सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर तमिळनाडूमध्ये रा.स्व. संघाकडून ४५ ठिकाणी काढण्यात आल्या फेर्या !
चेन्नई (तमिळनाडू) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून १६ एप्रिल या दिवशी राज्यातील ४५ ठिकाणी भव्य फेर्या काढण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन सरकारकडून या फेर्यांवर बंदी घालण्यात आली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनुमती देण्यात आली. राज्य सरकारचे म्हणणे होते, ‘संघाच्या फेर्यांमुळे राज्यात अस्थिरता निर्माण होईल आणि त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल.’ न्यायालयाने आदेशात, ‘या फेर्यांमध्ये बांबूच्या काठ्यांचा वापर करण्यात येऊ नये’, असे नमूद केले होते.
राज्यातील चेन्नई, वेल्लोर, होसुर, सालेम, चेंगलपट्टू, कांचीपूरम्, तिरुवन्नामलाई, अरानी, कोईम्बतूर, मेट्टूपलायम्, पल्लादम्, करूर, टेंकसी, कन्याकुमारी, तिरूचिरापल्ली आणि मदुराई या प्रमुख ठिकाणी या फेर्या काढण्यात आल्या. या फेर्यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते. राजधानी चेन्नईच्या कोरत्तूर येथे काढण्यात आलेल्या फेरीमध्ये केंद्रीय मत्स्य पालन आणि पशुपालन राज्यमंत्री डी.एल्. मुरुगन् सहभागी झाले होते.