कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथे शंभु महादेव कावड यात्रा उत्साहात पार पडली !
कासेगाव (जिल्हा सोलापूर), १७ एप्रिल (वार्ता.) – तालुका दक्षिण सोलापूर येथे ८०० वर्षांपूर्वीचे पुरातन हेमाडपंथी शंभु महादेव मंदिर आहे. प्रतिवर्षीप्रमाणे शंभु महादेवाची कावड यात्रा मोठ्या उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडली. कासेगाव, गंगेवाडी येथून मानकरी वाडकर आणि जाधव परिवाराच्या वतीने कावडकाठी शिखर शिंगणापूर येथे नेऊन महादेवाला जलाभिषेक करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. चैत्र शुक्ल दशमीला भाविक कावड घेऊन निघतात. कठीण वळण असलेल्या मुंगी घाटातून कावड नेत असतांना श्रद्धेची कसोटी लागते.
गावी परत आल्यानंतर कृष्ण पक्षातील चतुर्थीला कासेगाव येथे यात्रा भरली. पहिल्या दिवशी रोकडे मळा येथे भंडारा झाला, तर दुसर्या दिवशी सकाळी नगरप्रदक्षिणा करण्यात आली. सायंकाळी थोरला मळा येथे भंडारा करण्यात आला. रात्री पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून कावडची मिरवणूक काढण्यात आली. पहाटे ४ वाजता शंभू महादेव मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली. आरती झाल्यानंतर कावडीचे गंगेवाडीकडे प्रस्थान झाले. यात्रा यशस्वी होण्यासाठी नितीन वाडकर, महेश वाडकर, पुरुषोत्तम वाडकर, शंकर वाडकर, यशपाल वाडकर यांच्यासह समस्त वाडकर बांधवांनी परिश्रम घेतले.
शिखर शिंगणापूरप्रमाणे रचना असणारे कासेगाव येथील शंभु महादेवाचे मंदिर !शिखर शिंगणापूर येथे शंभु महादेवाचे मंदिर बांधणार्या राजा सिंघणदेव यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव (तालुका दक्षिण सोलापूर) येथे शिंगणापूरसारखीच रचना असणारे मंदिर बांधण्यात आले. सिंहासनावरील शिवलिंग दुर्मिळ असल्याचे येथील काही ज्येष्ठ मंडळी सांगतात. मंदिराची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, सकाळी सूर्याची किरणे लिंगावर पडतात. मंदिरातील दगडांवर सुंदर नक्षीकाम असून दगडी खांब कोरीव आणि आकर्षक आहेत. शिखरावर हनुमान आणि अन्य देवीदेवता यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या वरील बाजूला १२ ज्योतिर्लिंग आहेत, तर लिंगासमोर पितळी धातूचा नंदी आहे. |