‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १३ जणांचा मृत्यू !

  • १८ जण रुग्णालयात भरती

  • ३०० जणांना उष्माघाताचा त्रास

सोहळ्याला उपस्थित श्री सदस्य

नवी मुंबई – ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केल्याचा सोहळा संपल्यानंतर अनेक श्री सदस्यांना (संप्रदायातील सदस्यांना) उष्माघाताचा त्रास झाला. उष्माघातामुळेे १३ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उष्माघाताचा त्रास झालेलेे १८ जण कळंबोलीतील एम्.जी.एम्. रुग्णालयात उपचार घेत आहेत. जवळपास ३०० जणांना उष्माघाताचा त्रास झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन श्री सदस्यांची भेट घेतली. त्यांच्या उपचारांचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे घोषित केले, तसेच मृत सदस्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही रात्री या रुग्णांची भेट घेतल्यानंतर सत्ताधार्‍यांवर टीका केली.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता; म्हणून कार्यक्रम भर दुपारी घेण्यात आला.’’ अजित पवार यांनी ‘आधी श्री सदस्यांवर व्यवस्थित उपचार करावेत, त्यानंतर यात कोण दोषी होते ?, हे पहावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘रुग्णालयात एकूण ८ जण उपचार घेत आहेत, तर २ जण अतीदक्षता विभागात आहेत. त्यांतील एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे’, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ‘काही जणांनी सांगितले की, आमच्या पोटात काहीच नव्हते. काहींनी केवळ फळे खाल्ली होती. पाण्याची व्यवस्था होती; पण उन्हाची तीव्रता पुष्कळ होती. कार्यक्रम संपल्यानंतर थोडी चेंगराचेंगरी झाल्याचेही काहींनी सांगितले’, असेही अजित पवार म्हणाले. ‘उन्हाची तीव्रता अधिक होती. ऐन उन्हाळ्यात कार्यक्रमाची वेळ भर दुपारची निवडणे, हीच आयोजकांची चूक आहे. आपल्यातील निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने लोक येतात. त्यानुसार काळजी घ्यायला हवी होती’, असेही ते म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारला हा प्रसंग टाळता आला असता. हा कार्यक्रम सकाळी घेण्याची आवश्यकता नव्हती. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनावर बोलवून कार्यक्रम करता आला असता. झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. कसे कुणाला उत्तरदायी धरावे कळत नाही. कार्यक्रम संध्याकाळी घेतला असता, तर हा प्रसंग टाळता आला असता.’’


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे पत्र –

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)