निगडी (पुणे) येथे उद्घाटनाअभावी ‘गदिमा नाट्यगृह’ कुलूपबंद !
पुणे – सत्ताधारी नेत्यांना वेळ मिळत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ६६ कोटी रुपये खर्च करून बांधलेले निगडी प्राधिकरणातील ग.दि. माडगूळकर (गदिमा) नाट्यगृह गेल्या ८ मासांपासून बंद स्थितीत आहे. नाट्यगृहाचे कामकाज जुलैमध्ये पूर्ण झाले आहे. यापूर्वी दोन वेळा मिळालेली उद्घाटनाची वेळ अचानक रहित झाली. त्यामुळे ‘नाट्यगृह केव्हा खुले होईल ?’, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (८ मास नाट्यगृह बंद असल्याने जनतेचा पैसा वाया गेला, तो कोण भरून देणार ? – संपादक)
प्राधिकरणातील ५ सहस्र चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह बांधण्यात आले. शहरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांव्यतिरिक्त इतर खासगी कार्यक्रम जास्त होतात. त्यामुळे नाट्यकलावंत आणि कलाकार यांना कला सादरीकरणास शहरात वाव मिळत नाही. त्यामुळे अनेक कलाकार पुण्यातील नाट्यगृहांना प्राधान्य देतात. कला सादरीकरणासाठी कलादालन असावे, अशी शहरातील कलावंतांची इच्छा आहे. त्यांची प्रतीक्षा गदिमा नाट्यगृहाद्वारे पूर्ण होणार आहे; मात्र ‘अद्याप उद्घाटनासाठी किती प्रतीक्षा करावी ?’, अशी विचारणा केली जात आहे.
संपादकीय भूमिकानाट्यगृहाचे उद्घाटन सत्ताधारी नेत्यांकडून नव्हे, तर मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांकडून करून घेणे उचित ठरेल ! |