प्रेमळ, प्रगल्भ आणि देवाच्या अनुसंधानात असणारी फोंडा (गोवा) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !
चैत्र कृष्ण एकादशी (१६.४.२०२३) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिचा १२ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिचे लहान भाऊ सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) आणि तिचे आई-वडील, आजी-आजोबा यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘हा लेख वाचून खूप आनंद झाला. श्रियामध्ये एवढी वैशिष्ट्ये आहेत, हे श्रियाच्या आई-वडिलांमुळेच कळले. त्यासंदर्भात त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१४.४.२०२३) |
१. पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) (कु. श्रियाचे लहान भाऊ)
अ. ‘मला कु. श्रियाताईकडे बघितल्यावर नारायण (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) दिसतात. नंतर मला श्रियाताई दिसते.
आ. ताईकडे बघितल्यावर मला शक्ती जाणवते आणि तिच्याभोवती पिवळा रंग दिसतो.
इ. ताई सतत नारायणाच्या स्मरणात असते.
ई. ‘ती शिबिरात बोलते किंवा भावजागृतीचे प्रयोग सांगत असतांना ‘नारायण बोलतात’, असे मला वाटते.
उ. ताई जेव्हा नामजप करते, तेव्हा तिच्याभोवती पांढरा आणि लाल रंग दिसतो. तेव्हा मला शांत वाटते.
ऊ. मला माझी श्रियाताई फार आवडते. नारायणा, ‘तुम्ही मला श्रियाताई दिली’, याबद्दल कृतज्ञता !’
२. श्री. विष्णु राजंदेकर आणि सौ. आरती राजंदेकर, पुणे (कु. श्रियाचे आजी-आजोबा (वडिलांचे आई-वडील)
२ अ. वेगवेगळे आणि सुंदर भावजागृतीचे प्रयोग सांगून सर्वांना दिव्य भावविश्वात नेणे : ‘जसे आपण देवाला वेगवेगळी फुले अर्पण करतो, त्याप्रमाणे श्रिया वेगवेगळे आणि सुंदर भावजागृतीचे प्रयोग सांगते. ती प्रयोग सांगतांना आपल्याला प्रयोगातील दिव्य भावविश्वात सहजपणे घेऊन जाते. ‘प्रयोग पूर्ण झाल्यावर ती आम्हाला काय अनुभवले ?’, याविषयी विचारते. ती भावजागृतीचे प्रयोग, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतांना सर्वांची भावजागृती होते. ती ‘आम्हाला काय जाणवले ?’, हे समजून घेते.
२ आ. ‘भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी देवाला अनुभवता येण्यातच खरा आनंद आहे’, असे सांगणे : ती प्रेमाने सांगते की, ‘प्रतिदिन आपण प्रत्येक भावजागृतीच्या प्रयोगात ‘देवाच्या अधिकाधिक जवळ जायला पाहिजे आणि आपल्याला देवाला अनुभवता यायला पाहिजे. त्यातच खरा आनंद आहे.’ त्यामुळे आमची अधिकाधिक वेळ भावस्थितीत रहाण्याची तळमळ वाढते.’
३. सौ. जयश्री बक्षी, नागपूर (कु. श्रियाची आजी (आईची आई))
३ अ. व्यष्टी साधनेसाठी साहाय्य करणे : ‘श्रियाने मला ‘चुका ५ टप्प्यांत लिहिणे (टीप), व्यष्टी साधनेचा आढावा कसा द्यायचा ? प्रत्येक कृती करतांना भाव कसा असायला हवा ?’, याविषयी समजावून सांगितले. तेव्हापासून माझे प्रयत्न नियमित होऊन माझ्या आत्मविश्वासातही वाढ झाली.’
टीप : ‘चूक काय झाली ? त्यामागे स्वभावदोष कोणता होता ? चुकीचा परिणाम स्वतःवर किंवा समष्टीवर काय झाला ? चूक पुन्हा होऊ नये, यासाठी उपाययोजना आणि पापक्षालन होण्यासाठी प्रायश्चित्त काय घेतले ?’, अशी पाच टप्प्यांत चूक लिहितात.
४. सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३९ वर्षे) आणि श्री. अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३९ वर्षे)(कु. श्रियाचे आई-वडील), फोंडा, गोवा.
४ अ. ‘आपल्या जीवनात जे होते, ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या इच्छेने होते’, असा भाव ठेवून नेहमी स्थिर राहून गुरुस्मरणात रहाणे : ‘लहानपणापासूनच कु. श्रियाचा स्वभाव स्थिर आहे. ती बाह्य परिस्थितीमुळे अस्वस्थ होत नाही. ती नेहमी आनंदी असते. याविषयी तिला विचारल्यावर ती म्हणते, ‘‘परम पूज्य गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपले गुरु आहेत. त्यांनी आपल्याला ‘नामजप करणे आणि अनुसंधानात रहाणे’, असे साधनेचे सर्व घटक शिकवले आहेत. मग ‘आपल्या जीवनात जे होते, ते त्यांच्याच इच्छेने होते’, असा भाव ठेवून ते स्वीकारून आपण पुढे जायला पाहिजे. ही आपली साधना आहे. गुरु आपल्यासाठी जे काही करतात आणि जे देतात, ते आपल्यासाठी सर्वाेत्तम आणि योग्यच असते. आपण परिस्थितीनुसार आपली मनःस्थिती का विचलित करायची ? त्यापेक्षा स्थिर राहून गुरुस्मरणात रहाणे चांगले असते.’’
४ आ. प्रेमभाव : ती सर्वांशीच प्रेमाने आणि आपुलकीने बोलते; परंतु ‘ती कुणामध्ये अडकत नाही’, असे आम्हाला जाणवते.
४ इ. कुणाकडून अपेक्षा नसणे : तिला साधक, नातेवाईक किंवा कुणाकडून कसल्याच अपेक्षा नसतात. श्रिया सर्वांमध्ये असूनही अलिप्त असते. ‘गुरुदेवांनी आपल्याला जे शिकवले आहे, तसेच आपण वागायचे, बाकी देवाची इच्छा’, असे तिचे म्हणणे असते.
४ ई. श्रियाच्या आवाजात गोडवा असून ती बोलत असतांना निर्माण होणार्या नादातून मन निर्विचार होणे : तिचे बोलणे अतिशय मधुर आणि लयबद्ध आहे. तिच्या आवाजातील गोडवा आणि सहजता यातून तिच्या मनाची निर्मळता अन् प्रीती हे गुण सहजतेने लक्षात येतात. साधक, समाजातील व्यक्ती आणि नातेवाईक यांना तिच्यामधील हे वैशिष्ट्य जाणवते. श्रियाच्या आवाजात एक प्रकारचा नाद ऐकू येतो. ती बोलत असतांना एका लयीत बोलते. त्या वेळी तिच्या शब्दांकडे लक्ष जाण्यापेक्षा ती बोलत असतांना निर्माण होणार्या नादाने मन पूर्णपणे निर्विचार होते.
४ उ. प्रगल्भता : श्रियाची प्रगल्भता ही तिच्या वयापेक्षा अधिक असून तिचे वागणे आणि बोलणे यांतून ते लक्षात येते. ती लहान मुलांशी सहजपणे एकरूप होऊन खेळते आणि त्यांना सांभाळते. तेवढ्याच सहजतेने ती वयस्कर आणि मध्यम वयाच्या साधकांशी एकरूप होऊन जाते. पू. वामन यांनाही ती छान सांभाळते. ती त्यांच्याशी खेळतांना आणि इतर वेळीही स्वतःचा लहान भाऊ अन् बालसंत म्हणून दोन्हींचा समतोल साधते. ती त्यांच्याकडून शिकते आणि त्यांचे आज्ञापालन करते, तसेच लहान भाऊ म्हणून त्यांना काही गोष्टी समजावून सांगते आणि त्यांची काळजी घेते. ती हे सर्व प्रयत्न प्रेमाने आणि सहजतेने करते.
४ ऊ. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींना साधनेत साहाय्य करणे : कुटुंबातील वयस्कर व्यक्तींनाही श्रियाचा आधार वाटतो. ते वयाने मोठे असूनही तिच्याशी मनमोकळेपणाने बोलतात. त्यांच्या साधनेच्या अडचणी विचारतात किंवा त्यांना येणार्या अनुभूती सांगतात. श्रिया ते सर्व शांतपणे ऐकून घेते. आवश्यकता असल्यास ती त्यांना संत आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्याकडून तिला शिकायला मिळालेली सूत्रे सांगते.
४ ए. साधनेची तळमळ : ती तिच्या मनाची स्थिती आणि साधना यांचा आढावा देते. त्या वेळी ‘मला सर्व कळते’, असा तिचा विचार नसतो, तर ‘मी कुठे अल्प पडते ? मी अजून काय प्रयत्न करू ?’, असे ती आम्हाला आणि पू. वामन यांना विचारते. त्यासाठी ती ‘आश्रमातील साधक आणि संत हे कसे प्रयत्न करतात ?’, हे समजून घेते. ती वयस्कर साधकांशी बोलतांना ‘त्यांना गुरुदेवांनी कसे शिकवले ?’, हे जाणून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करते. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमितपणे वाचते आणि त्यातील साधनेविषयीचे लेख अभ्यास करून संग्रही ठेवते आणि लेखात सांगितलेली सूत्रे कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. तशी कृती केल्यानंतर ती त्यातील आनंदही अनुभवते.
४ ऐ. देव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सतत अनुसंधानात असल्यामुळे श्रियाचा चेहरा आनंदी, समाधानी आणि तेजस्वी दिसणे : ‘श्रियाच्या सर्व कृती, विचार, वागणे आणि बोलणे यांतून तिचा अहं पुष्कळ अल्प आहे’, असे आम्हाला जाणवते. ती सतत अंतर्मुख असते. ‘ती देव आणि परम पूज्य गुरुदेव यांच्या सतत अनुसंधानात आहे’, असे आम्हाला जाणवते. त्यामुळे तिचा चेहरा आनंदी, समाधानी आणि तेजस्वी दिसतो. तिचे हे वैशिष्ट्य साधक, समाजातील व्यक्ती आणि नातेवाईक यांनाही जाणवते.
४ ओ. गुरूंप्रती भाव : परम पूज्य गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) विषय निघाला किंवा त्यांचे नाव घेतले, तरी तिची भावजागृती होते. ती सर्व संत, देवता आणि साधक यांच्यात गुरुदेवांना बघते. त्यामुळे तिला गुरुदेवांचे नुसते रूप आठवले, तरी तिची भावजागृती होते आणि तिच्या डोळ्यांतून भावाश्रू वहातात. ‘गुरुदेवांसाठी आपण काय केले, तर त्यांना आनंद होईल ?’, असा तिचा सतत विचार असतो.
४ औ. ‘श्रियामध्ये जन्मतःच पुष्कळ दैवी गुण असणे आणि देवच तिला घडवत आहे’, अशी जाणीव होणे : श्रियामध्ये जन्मतःच पुष्कळ दैवी गुण आहेत. त्यामुळे आम्हाला तिच्यावर वेगळे संस्कार करावे लागले नाही. कोणतीही गोष्ट एकदा सांगितली, तरी तिला ती लगेच समजते. ‘साधना कर किंवा करायला पाहिजे’, हे आम्ही तिला कधीच वेगळे सांगितले नाही. ती साधना आणि प.पू. गुरुदेव यांच्याप्रती श्रद्धा, भाव आणि भक्ती हे सर्व जन्मतःच घेऊन आली आहे. तो तिचा स्थायीभावच आहे. तिचे विचार आणि अनुभूती ऐकल्यावर ‘देवच तिला आतून घडवत आहे’, असे आम्हाला वाटते.
४ अं. शिबिरात सांगावयाच्या सूत्रांचा अभ्यास करून सूत्रे मांडणे आणि सतत शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने आनंद मिळणे : रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात होणार्या विविध शिबिरांमध्ये दैवी बालकांचा परिचय करून देतात. त्यात श्रियाला तिच्या साधनाप्रवासाविषयी सूत्रे सांगायची असतात. तेव्हा ती गुरुदेवांना प्रार्थना करून सर्व सूत्रे वहीत लिहून काढते. त्यांचा सराव करते आणि मगच शिबिरात सांगते. ती घरी आल्यावर शिबिरात शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभूती तत्परतेने लिहून देते. ती सतत शिकण्याच्या स्थितीत रहाते आणि त्यातून तिला पुष्कळ आनंद मिळतो.
४ क. ‘समष्टी सेवा केल्यामुळे आध्यात्मिक गुण वाढून चांगली साधना करत आहे’, असे तिच्या आई-वडिलांच्या लक्षात येणे : श्रिया रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा शिकत आहे. तिला सेवेची संधी मिळाली; म्हणून सतत कृतज्ञता वाटते. सेवा शिकत असतांना तिच्यात इतरांचा विचार करणे, इतरांची आवड-नावड समजून घेणे, प्रेमभाव, असे गुण वाढले आहेत. ती दायित्व घेऊन सेवा करणे, प्रत्येक कृती विचारून करणे, नियोजनकौशल्य आणि सेवांचा आढावा देणे इत्यादी बारकावे शिकत आहे. यामुळे ‘तिचे आध्यात्मिक गुणही वाढत आहेत आणि ती अधिक चांगली साधना करत आहे’, असे लक्षात येते.
४ ख. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून शिकून घेणे अन् त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव असणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, सत्संग, त्यांचा सहवास अन् त्यांची प्रीती यांमुळे गुरु-शिष्य नाते कसे असते ?’, हे श्रियाला ‘साधनेत अधिक समृद्ध करत आहे’, असे आम्हाला जाणवते. प्रत्येक वेळी ती त्यांच्या सत्संगातून साधनेची तत्त्वे शिकत आहे. ती स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही प्रकारच्या अनुभूतींमधून सतत अंतर्मुख रहाण्याचा प्रयत्न करते. तिच्या मनात त्यांच्याबद्दल अपार प्रेम आणि दृढ श्रद्धा आहे. त्यांच्याबद्दल बोलतांना तिच्या मनात नेहमी कृतज्ञताभाव आणि आदरभाव व्यक्त होतो.
‘परम पूज्य गुरुदेव, केवळ आपली कृपा म्हणून आम्हाला श्रियासारख्या बालसाधिकेचे आई-वडील होण्याची संधी मिळाली आहे. ‘तिची ही गुणवैशिष्ट्ये लिहितांना ही आमची मुलगी आहे’, असा विचार आमच्या मनात एकदाही आला नाही. ‘तिची गुणवैशिष्ट्ये लिहून देतांना आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे’, असा विचार अधिक होता. परम पूज्य, ‘आज श्रियामध्ये जे गुण आणि साधकत्व आहे, ते केवळ आपल्यामुळेच आहे. आपण तिला जन्मापूर्वीपासून सांभाळत आहात.’ आपल्या रूपाने आश्रमातील संत आणि साधक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तिच्या साधनेच्या प्रवासात तिला उत्तम शिष्य घडवण्यासाठी साहाय्य करत आहेत. सर्व संत आणि साधक यांच्याप्रती आम्ही पुष्कळ कृतज्ञ आहोत. परम पूज्य, ‘आपल्या चरणी किती आणि कशी कृतज्ञता व्यक्त करावी ?’, ते आम्हाला कळत नाही. त्यासाठी शब्दच नाहीत. आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. ‘अशीच अखंड कृपादृष्टी असू द्या’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’ (२६.३.२०२३)
नामजप करतांना चेहेर्यावरचे भाव बघूनच भावजागृती होणेज्या वेळी कु. श्रिया भावजागृतीचे प्रयोग करत नामजप करते, त्या वेळी तिच्या चेहेर्यावरचे भाव बघूनच आमची भावजागृती होते. ती परम पूज्य गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अंतर्मनातून आळवत असते. ‘तिचा प्रत्येक नामजप पुष्परूपाने गुरुचरणी अर्पण होत आहे’, असेच आम्हाला जाणवते. अनेक वेळा नामजप करता करता तिचे ध्यान लागते आणि ‘तिने किती वेळ जप केला’, हे तिच्या लक्षात येत नाही. ‘ती नामजप करत असतांना नामजप, म्हणजे परम पूज्य गुरुदेवांशी तिचा भावसंवादच चालू आहे’, असे आम्हाला जाणवते. काही वेळा ती तिच्या मनातील प्रश्न, साधनेविषयीची अडचण किंवा तिच्याकडून झालेल्या चुकांची क्षमायाचना आत्मनिवेदन स्वरूपात करतांना तिच्या चेहेर्यावरील भाव बघूनच तिच्यातील आर्तभावाची जाणीव होते. – सौ. मानसी राजंदेकर आणि श्री. अनिरुद्ध राजंदेकर (कु. श्रियाचे आई-वडील), फोंडा, गोवा. |
|