आजपासून गोव्यात ‘जी २०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाची दुसरी बैठक !
‘जी २०’चे १९ देश, १० आमंत्रित देश आणि २२ आंतरराष्ट्रीय संघटना यांचे १८० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार
(जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.)
पणजी, १६ एप्रिल (वार्ता.) – भारताच्या ‘जी २०’ शिखर परिषदेच्या आरोग्य कार्यगटाची दुसरी बैठक १७ ते १९ एप्रिल या कालावधीत गोव्यात होत आहे. या बैठकीत ‘जी २०’चे १९ देश, १० आमंत्रित देश आणि २२ आंतरराष्ट्रीय संघटनांचे १८० हून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. या बैठकीत ‘हेल्थ ट्रॅक’ अंतर्गत निवडण्यात आलेले आरोग्यासंदर्भातील आपत्कालीन स्थितीला प्रतिबंध, त्यासाठीची सज्जता आणि प्रतिसाद (एक आरोग्य आणि प्रतिजैविक प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणे), तसेच सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि लाभदायक वैद्यकीय प्रतिकार (लस, उपचार आणि निदान) यांची सुगम्यता अन् उपलब्धता यांवर लक्ष केंद्रित करून औषधनिर्मिती क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे या विषयांवर प्राधान्यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच ‘डिजिटल आरोग्य’ विषयक नवोन्मेष आणि उपाय, सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती अन् आरोग्य सेवा वितरण सुधारण्यास साहाय्य करणे या विषयांवरही बैठकीत चर्चा होणार आहे.
I extend a cordial welcome to the distinguished delegates of the G20 nations to the picturesque land of Goa. 1/4 @g20org @G20Goa @PMOIndia pic.twitter.com/LoFaX98ilo
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 16, 2023
या कालावधीत ‘अतिथी देवो भवः ।’ या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित भारतातील समृद्ध विविधता आणि संस्कृती यांचे दर्शन घडवण्याच्या उद्देशाने गोव्याच्या संस्कृतीची ओळख करून देणार्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिनिधी गोव्याच्या निसर्गसौंदर्याचा तसेच आदरातिथ्याचा आनंद घेण्यासह येथील खाद्यसंस्कृतीचाही अनुभव घेणार आहेत. या बैठकीच्या निमित्ताने ‘डिजिटल आरोग्या’वर एक विशेष कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे. देशभरात विविध ठिकाणी या बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवणे, हा यामागचा उद्देश आहे. भारताने १ डिसेंबर २०२२ या दिवशी ‘जी २०’चे अध्यक्षपद स्वीकारले. भारत सध्या ‘जी २०’ त्रिकुटाचा (ट्रोइका) भाग आहे, ज्यामध्ये इंडोनेशिया, भारत आणि ब्राझिल यांचा समावेश आहे आणि ‘ट्रोइका’मध्ये प्रथमच ३ विकसनशील अन् उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी अनावरण केलेली ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या भारताच्या तत्त्वज्ञानावर आधारित ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना जगभरातील लोकांसाठी कोरोना महामारीनंतरचे निरोगी जग उभारण्याच्या दिशेने आकर्षक संकल्पना आहे. आरोग्य सहकार्याशी निगडित विविध बहुपक्षीय मंचांवरून एकवाक्यता साधणे आणि एकात्मिक कृतीच्या दिशेने कार्य करणे, ही भारताची उद्दीष्टे आहेत.