बांधकाम व्यावसायिक डी.एस्. कुलकर्णी यांच्यावर सीबीआयकडून २ गुन्हे नोंद !
पुणे – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डी.एस्.के.) यांच्या विरोधात सीबीआयने दोन गुन्हे नोंद केले आहेत. त्यांच्यावर ५८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १ जुलै २०२० या दिवशी स्टेट बँकेने दिलेल्या पत्राच्या आधारे पहिला गुन्हा नोंद केला आहे. त्यांनी ६५० कोटी रुपयांच्या कर्जापैकी ४३३ कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे, तर दुसऱ्या प्रकरणात सेंट्रल बँक ऑफ इंडियाने १ फेब्रुवारी २०२२ या दिवशी दिलेल्या लेखी पत्रामुळे दुसरा गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये डी.एस्.के. समुहाची उपकंपनी असलेल्या ‘डी.एस्.के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लिमिटेड’ या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या आस्थापनाने १५६ कोटी रुपयांचे अपव्यवहार केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.
१. ६० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करणार असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तशी कोणतीही नोंद आढळून आली नाही.
२. ज्या उद्देशासाठी आस्थापनाला कर्ज दिले होते, ते कर्ज त्या कारणासाठी न वापरता मिळालेली रक्कम मूळ आस्थापनाचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले.
३. स्टेट बँकेने केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आस्थापनात मोठ्या प्रमाणावर व्हेंडर आस्थापनासमवेत पैशांचा व्यवहार केल्याचे दाखवले होते; मात्र ज्या आस्थापनांना हे पैसे दिल्याचा दावा केला आहे, त्या आस्थापनांचे पत्ते, तसेच त्या अस्तित्वात नसल्याचेही अन्वेषण निष्पन्न झाले आहे.