अवेळी पडलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात टोमॅटो, द्राक्षे आणि फळबागा यांची मोठी हानी !
लातूर – अवेळी पडलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात टोमॅटो, द्राक्ष आणि फळबागा यांची मोठी हानी झाली आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामध्ये टोमॅटोची हानी झाली आहे. हानीग्रस्त शेतकऱ्यांनी टोमॅटो बांधावर फेकून दिले आहेत, तसेच तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी आणि आजूबाजूचा परिसर, रेणापूर तालुक्यातील पानगाव, आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागेचे क्षेत्र असून त्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. काही ठराविक अंतरानंतर सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. बाजारात शेतमालाला उठाव नाही आणि त्यातच होणारी हानी शेतकऱ्याची आर्थिक घडी तोडणारी आहे.
यानंतरच्या पुढच्या काही दिवसांतही हवामान विभागाने राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे, तर उर्वरित राज्यात उन्हाळा कायम रहाण्याची शक्यता आहे.