विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंडळाचे मार्गदर्शक सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांचे अपघाती निधन
ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे
अमरावती, १६ एप्रिल (वार्ता.) – विश्व हिंदु परिषदेचे प्रांतीय मंडळाचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे, घाटलाडकी; ह.भ.प. शाश्वतानंद सरस्वती (अखंडानंद आश्रम, आडगाव), ह.भ.प. प्रभुजी मदनकर (धर्माचार्य संपर्क प्रमुख) हे तीनही धर्मयोद्धे संत नागपूर येथे विश्व हिंदु परिषदेच्या प्रांत बैठकीला जात होते. १३ एप्रिल या दिवशी कारंजा घाडगे येथील पुलावर त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने पुलावरून अंदाजे १५ ते २० फुटांवरून गाडी खाली कोसळली. त्यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयांत उपचार चालू होते; पण ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांचे १५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता निधन झाले.
याविषयी माहिती देतांना विश्व हिंदु परिषदेचे प्रांत प्रमुख (नैतिक मूल्य शिक्षण) डॉ. सुरेशराव चिकटे यांनी सांगितले, ‘‘ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांनी कथा, प्रवचन या माध्यमांतून हिंदूसंघटनासाठी कार्य करून संपूर्ण आयुष्य हिंदु धर्मरक्षणासाठी वेचले. धर्मातील अशी विभूती जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.’’