सुसंगती सदा घडो !
नुकतेच ‘ऑस्कर’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय वेशभूषा आणि व्रताचे पालन करत पुरस्कार स्वीकारणार्या अभिनेते रामचरण यांचे जगभर कौतुक झाले. त्यांचा राष्ट्राभिमान, संस्कृती यांविषयीची श्रद्धा इत्यादीला सर्वांनी अगदी डोक्यावर घेतले. ‘त्यांच्या इतके आदर्श अभिनेते कुणीच नाहीत’, असेच दृश्य निर्माण झाले होते. ‘त्यांच्या या गोष्टी हिंदी चित्रपटसृष्टीने शिकाव्यात’, असे सल्लेही सर्वांनी दिले. हे कौतुक अजून संपलेही नाही, तोच विरोधाभासी दृश्ये समोर आली. ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील ‘येनतम्मा’ या गाण्यामध्ये हिंदूंच्या मंदिरात लुंगी, चपला आणि बूट घालून अभिनेते सलमान खान, वेंकटेश आणि रामचरण नाचत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्याला हिंदूंकडून कडाडून विरोध होऊ लागला आहे. हे नृत्य अश्लील आणि बीभत्स असल्यानेही याला विरोध केला जात आहे. माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन् आणि तमिळनाडूतील समीक्षक प्रशांत रंगास्वामी यांनी ट्वीट करून या गाण्याला कडाडून विरोध केला आहे. ‘या चित्रपटाने दक्षिण भारतीय संस्कृतीचा अवमान केला आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.
यामुळे साहजिकच सर्वांच्या मनात रामचरण यांच्याविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले. यामध्ये रामचरण यांचे व्रत किंवा काही दिवसांपूर्वी दिसलेली श्रद्धा हा एक दिखावा होता का ? कि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली क्लृप्ती होती ? तसे जर नसेल, तर आपली तत्त्वे पाळून काम केले, तर ते जगमान्य होते, याचा त्यांना विसर पडला कि काय ? कि बॉलीवूडच्या संगतीत त्यांचीही वृत्ती पालटली ? असे प्रश्न पडतात. यामुळे दुर्दैवाने अभिनेते करत असलेल्या कोणत्या कृती खर्या आणि खोट्या, हे ओळखणे अवघड आहे. प्रत्यक्षात एखाद्या अभिनेत्याने एखाद्या कृतीतून धर्माभिमान दाखवला; म्हणून तो धर्माभिमानी आहे, असे असेलच असे नाही. सध्याची स्थिती पहाता तरुण पिढी समोर अभिनेते हे आदर्श आहेत. त्यामुळे तरुण पिढीनेही विचार करायला हवा की, अभिनेते त्यांचे जे रूप समाजासमोर दाखवतात, ते खरे कि प्रसिद्धीसाठी आहे ?
यावरून लक्षात येते की, संत सांगतात, तेच सत्य आहे. ‘सुसंगती सदा घडो…’ अन्यथा कधी कुणाची मती भ्रष्ट होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे मनोरंजनाच्या विश्वामध्ये प्रसिद्धीसाठीच सर्वकाही करणार्या अभिनेत्यांचा आदर्श ठेवायचा ? कि संतांचा ? हेही ठरवले पाहिजे !
– सौ. प्रांजली विजय ब्रह्मे, नागपूर