‘द इंडियन व्हेटर्निअरी रिसर्च इन्स्टिट्यूट’(आय.व्ही.आर्.आय.)ने केलेले गोमूत्र संशोधन दिशाभूल करणारे !
‘गोमूत्र शरिराला अपायकारक ठरू शकते’, असा निष्कर्ष भारतातील ‘आय.व्ही.आर्.आय.’ (द इंडियन व्हेटर्निअरी रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेने केलेल्या संशोधनात निघाल्याचे वृत्त वाचनात आले. या वृत्तावर ‘जमात ए पुरोगामी’ सध्या जणू पुत्र जन्मोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने आपली हिंदु संस्कृती, धर्म आणि अगदी आयुर्वेद यांनाही नावे ठेवण्याची एक नामी संधी चालून आल्याने त्यांचा आनंद ओसंडून वहात आहे.
काही महत्त्वाच्या गोष्टी
१. सदर संशोधनात देशी गायींचे मूत्र वापरले होते वा नाही, याचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यांना देण्यात येणारा आहार काय होता ? याची सविस्तर माहिती नाही.
२. गोमूत्रातील जीवाणू घातक असल्याचे हे संशोधन नमूद करत असल्याने त्याचे थेट सेवन टाळावे, असे त्यांचे मत आहे.
आयुर्वेदात देशी गायीचे मूत्र उपयोगात आणतांना फारच अल्प वेळा ते थेट वापरले जाते. बहुतेक वेळा त्यापासून औषधे सिद्ध करतांना त्यावर अग्नीसंस्कार होतात. त्यामुळे धोकादायक जीवाणू हा विषय फारसा महत्त्वाचा रहात नाही.
३. ‘म्हशीचे मूत्र हे गायीच्या तुलनेत अधिक जीवाणूरोधक आहे’, असे हे संशोधन सांगते. एरव्ही ‘गाय आणि डुक्कर यांच्या मूत्रात काहीच भेद नसतो’, असे मत मांडणार्या लोकांना ‘गायीपेक्षा म्हैस भारी’, या निष्कर्षाने हर्षवायू (आनंद) होत असल्यास ते स्वतःचेच आधीचे मत खोडून काढत आहेत !
४. गाय, म्हैस आणि मानव अशा एकूण मिळून ७३ मूत्र नमुन्यांवर हे संशोधन केले आहे. हा आकडा ठोस निष्कर्ष काढण्यासाठी फारच तोकडा आहे.
५. ज्या ‘आय.व्ही.आर्.आय.’ (द इंडियन व्हेटर्निअरी रिसर्च इन्स्टिट्यूट) ने संशोधन केले आहे, त्याचेच भूतपूर्व अध्यक्ष आर्.एस्. चौहान यांनी हे संशोधन दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले आहे. चौहान यांनी किमान २५ वर्षे गोमूत्र अर्कावर संशोधन केले असून अर्क सिद्ध करतांना जीवाणू या विषयाचा फार गवगवा करण्याचे काही कारण नसल्याचे त्यांचे संशोधन सांगते. आयुर्वेदात वर नमूद केल्याप्रमाणे अर्क, आसव, घोटणे, शिजवणे आदी प्रक्रिया करून मगच औषधे वापरली जात असल्याने हे सूत्र लागू होत नाही.
६. याच संस्थेच्या पदाधिकार्यांनी पूर्वी गोमूत्राविषयी केलेले संशोधन प्रसारित केल्यावर ‘हे संशोधन भारतात झाले असल्याने विश्वासार्ह नाही’, अशी टिप्पणी आज आनंद साजरा करणार्या लोकांनी केली होती. इतका दुटप्पीपणा करायलाही कौशल्य (स्किल) लागते.
७. याच संस्थेने गोमूत्र मानवी आरोग्यास उपयुक्त असल्याचा निष्कर्ष दिला असता, तर ‘जमात ए पुरोगामी’वाल्यांनी पंतप्रधान मोदी ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सार्यांचा उद्धार केला असता.
सरते शेवटी गोमूत्र हे वैद्यकीय सल्ल्याविना आणि दैनंदिन जीवनात सेवन करणे आयुर्वेदाला मुळीच अपेक्षित नाही. हा मुद्दा आम्ही गेली किमान १० वर्षे उघडपणे मांडत आहोत. याविषयी प्रत्येकाने सजग रहायला हवे. तरीही या संशोधनाचा गैरवापर करणार्यांच्या भूलथापांना कुंपणावरच्या लोकांनी आहारी जाऊ नये, यासाठी हे मुद्देसूद खंडण !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१२.४.२०२३)
हिंदूंना पूजनीय असलेल्या गायीविषयी दिशाभूल करणारे संशोधन हिंदूबहुल भारतात होणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! |