हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत आध्यात्मिक बळाचे योगदान !

सध्या आपल्या देशामध्ये हिंदु राष्ट्राची मागणी किंवा हिंदु राष्ट्राशी संबंधित चर्चा मोठ्या उत्साहात चालू आहे. असे असले, तरी आपल्या देशाची सध्याची व्यवस्था अभ्यासली, तर आपल्याला काय दिसून येते ? आताही देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदु राष्ट्राला विरोध करणार्‍यांचे प्रमाण पुष्कळ आहे आणि हिंदू अद्यापही पूर्ण संघटित नाहीत.


श्री. रवींद्र बनसोड

हिंदु राष्ट्र आणण्यासाठी धर्माची पुनर्स्थापना करायला हवी !

आपल्या देशाची संपूर्ण व्यवस्था तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी (सेक्युलर) लोकांच्याच हातामध्ये आहे. काही लोक धर्मनिरपेक्षता आणि मानवता यांच्या नावावर जिहाद्यांचे, तर काही जण हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांचे समर्थन करतात. देशाची न्याय, प्रशासन आणि शासन व्यवस्था भ्रष्टाचारी अन् अधर्मी लोकांच्या हातात आहे. आपला देश अद्यापही प्रचंड भ्रष्टाचार आणि अधर्म यांच्या दलदलीमध्ये पूर्णपणे बुडाला आहे. तो एवढा बुडालेला आहे की, कुणी साधारण व्यक्ती त्याला बाहेर काढू शकत नाही. अशा परिस्थितीत भारतात हिंदु राष्ट्र येऊ शकणार नाही का ? निश्‍चितपणे येऊ शकते; पण ते मनुष्याच्या साधारण प्रयत्नांनी येऊ शकणार नाही. हिंदु राष्ट्र आणण्यासाठी आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवर प्रयत्न करावे लागतील. हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, म्हणजे अधर्म नष्ट करून धर्माची पुनर्स्थापना करणे. धर्माची पुनर्स्थापना केवळ ईश्‍वर किंवा ईश्‍वरी अवतार, तसेच खरे गुरु आणि संतच करू शकतात; कारण साधारण आणि भौतिक स्तरावर केलेल्या प्रयत्नांनी आपल्या देशातच काय, जगात कुठेही धर्माची पुनर्स्थापना होऊ शकत नाही.

आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी साधनाच आवश्यक !

तर मग आपण काय करायला हवे ? यासाठी आपल्याला खरे संत आणि गुरु (जे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत आहेत) यांचे मार्गदर्शन घेऊन आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी साधना करावी लागेल. तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तळमळीने प्रयत्नरत असणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनेमध्ये सहभागी होऊन भौतिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करायला हवेत.

– श्री. रवींद्र बनसोड, फोंडा, गोवा. (७.४.२०२३)