जावळी तालुक्यातील करंदोशी येथील सैनिक कर्तव्य बजावतांना हुतात्मा !
सातारा, १५ एप्रिल (वार्ता.) – जावळी तालुक्यातील करंदोशी गावच्या तेजस लहूराज मानकर या सैनिकाला पंजाब येथील भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावतांना डोक्यात गोळी लागली. त्यांना उपचारासाठी सैनिकी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. तेजस यांना गोळी कशी लागली ? याचा शोध पोलीस घेत आहेत; मात्र तेजस यांच्या निधनाचे वृत्त समजतात संपूर्ण जावळी तालुक्यावर शोककाळा पसरली.
हुतात्मा सैनिक तेजस यांचे वडील सैन्यदलातून मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले असून भाऊ सैन्यदलात कर्नल पदावर कार्यरत आहेत. तेजस यांचे काका शशिकांत मानकर हेही सैन्यदलात सेवा बजावत आहेत. सैन्यदलातून देशसेवा करण्याची परंपरा मानकर कुटुंबियांमध्ये आहे. २ वर्षांपूर्वी तेजस सैन्यदलात भरती झाले.