राज्य सरकार प्रतिवर्ष काजू महोत्सव साजरा करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी येथे काजू महोत्सवाला प्रारंभ
पणजी, १५ एप्रिल (वार्ता.) – गोवा सरकार राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इतर महोत्सव साजरा करत असते. याच धर्तीवर गोवा सरकार यंदापासून प्रतिवर्ष काजू महोत्सव साजरा करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. पणजी येथील बांदोडकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या काजू महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि राज्यातील विविध उद्योजक यांची उपस्थिती होती. हा काजू महोत्सव १५ आणि १६ एप्रिल असा २ दिवस साजरा केला जाणार आहे.
Opening Ceremony of Cashew Fest Goa – 2023 https://t.co/GvNobkhMLO
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 15, 2023
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले,
‘‘काजू महोत्सवामुळे वनविकास महामंडळाने स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे आणि इतर महामंडळांनीही अशाच दृष्टीने प्रयत्न करावे. गोवा सरकारने यंदा काजूसाठी आधारभूत किमतीतही वाढ करून ती प्रतिकिलो १२५ रुपयांवरून १५० रुपये केली आहे. ही नवीन आधारभूत किंमत गतवर्षीही काजू उत्पादकांना लागू व्हावी, यासाठी प्रयत्न आहेत. काजू महोत्सवासारख्या महोत्सवामुळे पर्यटक काजू महोत्सवासाठी गोव्यात येणार आहेत. राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गोव्यातील कला आणि संस्कृती देशपातळीवर नेणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या मोहिमेनुसार गोव्यातील उत्पादनांना अधिकाधिक चालना कशी मिळेल, यासाठी गोमंतकियांनी प्रयत्न केले पाहिजेत.’’
Addressed the Opening Ceremony of #CashewFestival at Campal Ground, Panaji. 1/4 pic.twitter.com/jmNJhPWoiv
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 15, 2023
या महोत्सवात वैज्ञानिक चर्चासत्रे, प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये काजू उत्पादक, व्यापारी आणि संशोधक सहभागी झालेले आहेत. महोत्सवामध्ये शेतकर्यांना काजूचे अधिक उत्पादन देणार्या जाती, काजूच्या झाडांची काळजी आणि लागवडीच्या विविध पद्धती यांविषयी माहिती दिली जाणार आहे. या महोत्सवाचे फेणी उत्पादक आणि उपाहारगृहांचे मालक यांनी स्वागत केले आहे.
१६ एप्रिलला या महोत्सवात दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधीत गोव्याच्या प्रसिद्ध कोकणी गायिका लोर्ना यांचे गायन, वर्मा डिमेलो यांचा फॅशन शो आणि पार्श्वगायक स्टेबिन बेन यांचा कार्यक्रम होणार आहे.