निर्भीड वार्तांकन करणारे आणि हिंदु राष्ट्रविषयक चळवळींना बळ देणारे एकमेव नियतकालिक सनातन प्रभात !
दैनिक सनातन प्रभातच्या द्वितपपूर्ती वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी केलेले मार्गदर्शन
सनातन हिंदु धर्माचा विचार अग्रस्थानी ठेवून, किंबहुना या विचारांचेच अधिष्ठान ठेवून गेली २४ वर्षे अव्याहतपणे सनातन प्रभातची वाटचाल चालू आहे. कोणतेही राजकीय पाठबळ नसतांना, हिंदु विरोधकांच्या विरोधाला पुरून उरत तब्बल २ तप हिंदुत्वाच्या विचारांचे दैनिक चालवणे ही काही सोपी गोष्ट नाही. गेल्या काही वर्षांपासून देशभरात हिंदुत्वाचे वारे वहात असल्याचे चित्र आहे; पण जेव्हा हिंदुत्वाचा पुरस्कार करणेही अपराध वाटावा, अशी स्थिती होती, तेव्हा सनातन प्रभातने निर्भीडपणे हिंदुत्वाची बाजू उचलून धरली. प्रतिकूल परिस्थितीतही प्राणपणाने झुंज देणे, हा योद्ध्याचा गुण आहे. त्या अर्थाने सनातन प्रभात हे एक वर्तमानपत्र असले, तरी त्याची भूमिका वैचारिक योद्ध्यापेक्षा अल्प नाही.
आज हिंदु जनजागृती समिती आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय उराशी बाळगून मार्गक्रमण करत आहेत. या ध्येयाला, अर्थात् हिंदु राष्ट्रविषयक चळवळींना वैचारिक बळ पुरवण्याचे कार्य सनातन प्रभात करत आहे. हिंदु राष्ट्रविषयक चळवळींना प्रसिद्धी देऊन हिंदु राष्ट्राचा विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्यामध्ये सनातन प्रभातचे विशेष योगदान आहे. सनातन प्रभातने यंदा २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या २५ आकड्याचे हिंदु राष्ट्राच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे; कारण अनेक संत, भविष्यवेत्ते, द्रष्टे यांनी वर्ष २०२५ मध्ये भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे, असे सांगितले आहे. या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी, सामाजिक संघटना आणि सनातन प्रभात यांचे ऋणानुबंध आणखी दृढ व्हावेत, अशी आशा प्रकट करतो.
१. सनातन प्रभातचा दैनिक केसरीसारखा वाटा
जेव्हा कुठलीही चळवळ उभी करायची असते, तेव्हा तळागाळात म्हणजे फिल्डवर जाऊन काम करणे, जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच वैचारिक स्तरावर कार्य करणे, वैधानिक म्हणजे कायदेशीर स्तरावर काम करणे, चळवळीला जनाधार मिळवून देण्यासाठी सोशल मिडियासारख्या नवनवीन प्लॅटफॉर्मस्चा वापर करणे आदी सूत्रेही महत्त्वाची असतात. सनातन प्रभातने आरंभीपासूनच रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या संदर्भात वैचारिक दिशा सुस्पष्ट केली आहे. ती आम्हा हिंदुत्वनिष्ठांसाठीही वेळोवेळी मार्गदर्शक ठरत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी दैनिक केसरीमधून अत्याचारी इंग्रज सरकारवर आसूड ओढले होते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?, अशी विचारणा करण्याची धमक केसरीमध्ये होती. हिंदु राष्ट्राच्या चळवळीत सनातन प्रभातची भूमिकाही केसरीप्रमाणे म्हणजे एखाद्या सिंहाप्रमाणेच आहे, असे आम्ही मानतो. सनातन प्रभात हे आम्हा हिंदुत्वनिष्ठांचे हक्काचे व्यासपीठ आणि मुखपत्रच आहे.
२. बोध करून देणे
बोध करून देण्यातही सनातन प्रभात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बोध म्हणजे मन किंवा बुद्धी यांना येणारी समज. साधना हा मानवी आयुष्याचा महत्त्वाचा पैलू असून साधनेमुळे व्यक्तीमध्ये किती परिवर्तन होऊ शकते, याविषयीच्या अनुभूती सनातन प्रभातमध्ये वेळोवेळी प्रसिद्ध होतात. साधना म्हणजे काय ? ती कृतीत आणण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, याविषयीचे जे लेख प्रसिद्ध होतात, तेही दिशादर्शक असतात. हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांमध्ये साधना, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांविषयी मार्गदर्शन केले आहे; पण ते प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे, हे साधनाविषयक लेखांमधून शिकायला मिळते. थोडक्यात हिंदु धर्म महान आहे, असे नेहमी म्हटले जाते; पण या महानतेची प्रचीती स्वतः धर्माचरण किंवा साधना केल्याविना येऊ शकत नाही. ज्यांना अशी प्रचीती आली आहे, म्हणजेच ज्यांनी धर्माचे सामर्थ्य अनुभवले आहे, त्यांच्याकडून होणारे कार्य हे प्रभावी असते. थोडक्यात वाचकाला धर्मबोध करून देण्यात सनातन प्रभातचे योगदान अतुलनीय आहे.
२ अ. हिंदुत्वाच्या चळवळीला दिशा : सनातन विचारांमधून हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते म्हणून आम्हालाही योग्य दिशा मिळते. मध्यंतरी हिंदु अल्पसंख्य होऊ नयेत; म्हणून हिंदूंनी ४ मुले जन्माला घालावीत, असे आवाहन करण्यात आले होते. त्या वेळी संख्याबळ ही शक्ती नसून, आहे त्या हिंदुशक्तीचा वापर धर्महितासाठी कसा केला जाईल, हे पहाणे महत्त्वाचे आहे, अशा आशयाचा सनातन विचार प्रसिद्ध झाला होता. हिंदुत्वावरील आघात परतवून लावतांना भावनेच्या स्तरावर किंवा प्रतिक्रियात्मक उत्तर देणे अयोग्य ठरू शकते, हे यातून लक्षात येते. लव्ह जिहादला त्याच भाषेत तोंड देण्याच्या संदर्भातही सनातनचा दृष्टीकोन प्रसिद्ध झाला होता, हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्या धर्मांधांना पाप लागते. ते त्यांना भोगावेच लागते. हिंदूंनी तसेच केले, तर त्यांनाही पाप भोगावे लागेल. तसे होऊ नये म्हणून त्यांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करावे. थोडक्यात हिंदुत्वाचे कार्य न भरकटता सनातन धर्माच्या मार्गानेच होत रहावे, यासाठी धर्माचा दृष्टीकोन काय आहे, याचा बोध आम्हाला सनातन विचारांमधून होतो.
३. निर्भीड वार्तांकन
सनातन प्रभातचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सत्यनिष्ठ आणि निर्भीड वार्तांकन ! भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा धर्मांधांनी हिंदूंचा भीषण नरसंहार केला. हिंदूंच्या प्रेतांनी भरलेल्या रेल्वे पाकिस्तानातून भारतात यायच्या. तेव्हापासून धर्मांधांची हिंदूंवर जी आक्रमणे होत आहेत, ती अद्यापही थांबलेली नाहीत. यंदाही रामनवमीनिमित्त देशातील ७ राज्यांत सुनियोजितपणे दंगली घडवण्यात आल्या. या अत्याचारांच्या किंवा दंगलीच्या वार्तांकनामध्ये सनातन प्रभातने धर्मांधांनी केलेले अत्याचार समाजासमोर आणले. आजही असे दिसते की, अन्य वर्तमानपत्र किंवा प्रसिद्धीमाध्यमे यांच्याकडून दंगलीचे किंवा धर्मांधांच्या अत्याचारांचे वार्तांकन करतांना एका गटाकडून मारहाण किंवा २ गटांत हाणामारी असे शब्दप्रयोग वापरले जातात. आताही जेव्हा रामनवमीला धर्मांधांनी दंगली केल्या, तेव्हा एका प्रथितयश वृत्तवाहिनीने वार्तांकन न करण्याची भूमिका घेतली होती.
२ मासांपूर्वी कळंगुट येथील एका धर्मांधाने मुसलमानबहुल भागाचा उल्लेख पाकिस्तान गल्ली आणि मुसलमान गल्ली असा केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या वेळी शत्रूराष्ट्र पाकचा उदो उदो केल्याविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी त्या धर्मांधाला जाब विचारला आणि कान धरून क्षमायाचना करायला लावली; त्याला भारतमाता की जय अशा घोषणा द्यायला भाग पाडले. याचे वार्तांकन करतांना गोव्यातील एका दैनिकाने या प्रकरणी भारताची बाजू घेऊन धर्मांधाला जाब विचारणार्यांच्या कृतीचा कट्टर राष्ट्रवाद असा उल्लेख केला. सनातन प्रभातने मात्र ही कृती राष्ट्रप्रेमाची असल्याचे सांगत राष्ट्रहिताची बाजू उचलून धरली.
काही मासांपूर्वी धर्मांध आफताब पूनावालाने लव्ह जिहाद करत श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीचा उपभोग घेऊन तिच्या शरिराचे ३५ तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवल्याचे प्रकरण घडले होते. तेव्हा सोनी टीव्हीवरील क्राईम पेट्रोल २ या भागात धर्मांध आफताबची व्यक्तीरेखा मिहिर या हिंदु आणि श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची व्यक्तीरेखा अॅना फर्नांडिस या ख्रिस्ती नावाने दाखवली. त्याविषयी हिंदूंनी संताप व्यक्त केल्यावर सोनी टीव्हीने तो भाग वर्ष २०११ मध्ये झालेल्या एका घटनेवरील काल्पनिक भाग आहे, अशी दिलगिरी (क्षमा) व्यक्त केली आणि त्यांच्या अॅपवरील तो भाग डिलिट केला. एकीकडे या कार्यक्रमापूर्वी सूचना सांगितली जाते की, हा एपिसोड सत्य घटनेवर आधारित आहे, तर क्षमा मागतांना तो काल्पनिक कसा होतो ? यातून सोनी टिव्हीचा खोटारडेपणा दिसून येतो. असा प्रकार सनातन प्रभातने कधीही केला नाही. जे घडले, ते सांगून समाजामध्ये जागृती करण्याचा वसा सनातन प्रभातने घेतला आहे. आज समाजामध्ये हिंदुत्वाच्या दृष्टीने जे पूरक वातावरण झालेले दिसते, तसे होण्यामध्ये सनातन प्रभातचा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही.
४. मार्गदर्शक लेख
सनातन प्रभातमधून आयुर्वेद, राष्ट्रीय सुरक्षा, धर्मावर घेतले जाणारे आक्षेप आणि त्याचे खंडण, धर्मद्रोह्यांची षड्यंत्रे, हिंदूसंघटनाची आवश्यकता आदी वेगवेगळ्या अन् महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासकांचे आणि तज्ञांचे लेख प्रकाशित होतात. या लेखांचा, तसेच सनातन प्रभातमधील माहितीचा धर्मप्रसार करतांनाही विशेष लाभ होतो. हा अनुभव केवळ समितीचा आहे, असे नाही, तर हिंदु राष्ट्राच्या कार्यात जोडलेल्या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही असाच अनुभव येतो.
५. हिंदु राष्ट्रविषयक चळवळींना बळ
गोव्याच्या संदर्भात पहायचे झाले, तर संस्कृतीरक्षणाच्या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठांनी ज्या मोहिमा राबवल्या, त्या मोहिमांना बळ देण्याचे कार्य सनातन प्रभातने केले आहे.
५ अ. कॅसिनो, तसेच सनबर्न फेस्टिव्हलला विरोध : गोव्याची मूळ संस्कृती ही धर्मपरायण आहे. आज गोवा म्हणजे मौजमजा, हॉटेलिंग, बीच, कॅसिनो, दारू असे जे चित्र उभे केले आहे, ते गोव्याच्या संस्कृतीच्या विपरित आहे. गोव्यामध्ये अनेक प्राचीन, प्रशस्त आणि भव्य मंदिरे आहेत. या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी अनेक जण कार्यरत आहेत. गोव्याची मूळ संस्कृती काय आहे आणि कॅसिनो, सनबर्नसारख्या कार्यक्रमांतून कशा प्रकारे अमली पदार्थ आणि नशा यांना चालना देऊन लोकांना त्यांच्या संस्कृतीपासून दूर नेले जाते, याविषयीचे प्रबोधन सनातन प्रभातने केले.
५ आ. घुसखोरांना विरोध : गोव्यामध्ये अवैधरित्या रहात असलेले बांगलादेशी घुसखोर आणि धर्मांध यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. येथील मोती डोंगरावर अवैधपणे रहाणार्या धर्मांधांची वस्ती आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर सध्या बंदी असली, तरी धर्मांधांच्या कारवायांचा धोका आजही गोव्याला आहे. अवैधरित्या घुसलेल्या या धर्मांधांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे गोव्याच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यासारखे आहे. सनातन प्रभातने सातत्याने या संदर्भात आवाज उठवला आहे.
५ इ. धर्मांतराच्या कारवाया उजेडात आणणे : चर्चच्या माध्यमातून केल्या जाणार्या धर्मांतराच्या कारवायाही सनातन प्रभातने उजेडात आणल्या. हिंदूंना फसवून त्यांचे धर्मांतर होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक चर्चमधून लैंगिक शोषण झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. बिलिव्हर्सवाल्यांच्या कारवायांविषयी सनातन प्रभातने आरंभीपासूनच आवाज उठवला. धर्मांतराचा उद्देश, स्वरूप, त्याची कारणे, परिणाम आणि धर्मांतर रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांविषयी सनातन प्रभातने वेळोवेळी लेखांच्या माध्यमातून जागृत केली. काही दिवसांपूर्वी फाईव्ह पिलर्स चर्चचा पाद्री डॉम्निक डिसोझा याला धर्मांतराच्या कारवायांमुळे पोलिसांनी अटक केली होती. सनातन प्रभातने त्याच्या पुष्कळ आधीपासूनच धर्मांतरापासून सावध रहाण्यासाठी जागृती केली.
सनातन प्रभात केवळ बातम्या देऊन थांबत नाही, तर अनुचित घटना घडण्यामागचे कारण, त्याचे होणारे परिणाम आणि ते रोखण्यासाठीच्या उपाययोजना यांविषयीही भाष्य करते. कुठल्याही समस्येचे मूळापासून विश्लेषण करून सुराज्य निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना यांची दिशा देण्याचे कार्य करणारे सनातन प्रभात एकमेव नियतकालिक असावे.
५ ई. अन्य : गोव्यात काही वर्षांपूर्वी मूर्तीभंजनाचे जे प्रकार घडले होते, त्या विषयीही सनातन प्रभातने बातम्या प्रसारित केल्या. एन्.सी.ई.आर्.टी.च्या (राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या) अभ्यासक्रमाच्या इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ४ ओळींचा देऊन मोगल आक्रमकांचे उदात्तीकरण करण्याचा विषय असो, शैक्षणिक माध्यमांचा विषय असो किंवा पोर्तुगिजांनी हिंदूंवर केलेल्या अनन्वित छळाचा साक्षीदार असलेल्या हात कातरो खांबाला संरक्षित स्मारक म्हणून जतन करण्याचा विषय असो, सनातन प्रभातने नेहमी धर्म आणि राष्ट्र हितकारक भूमिका घेऊन धर्म अन् राष्ट्र हिताची आंदोलने बळकट करण्याचे कार्य केले. लेखणीच्या माध्यमातून जनआंदोलन उभे करण्याचे सनातन प्रभातचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
६. हिंदु राष्ट्राची आध्यात्मिक संकल्पना सुस्पष्ट करणे
आज सगळीकडे हिंदु राष्ट्राची चर्चा होत आहे. हिंदु राष्ट्र ही कोणती राजकीय संकल्पना नसून ती एक आध्यात्मिक संकल्पना आहे. विश्वकल्याणासाठी कार्यरत असलेल्या सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र म्हणजे हिंदु राष्ट्र ! हिंदुत्व, हिंदु राष्ट्र यांविषयीच्या आध्यात्मिक संकल्पना सुस्पष्ट करून त्याविषयी जागृती करण्याचे कार्य सनातन प्रभात करत आहे.
७. कृतज्ञता
नारदमुनी हे आद्य पत्रकार मानले जातात. पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ अशा त्रिलोकांमध्ये त्यांचा वावर आहे. धर्म-अधर्म यांच्या लढ्यात धर्माला नारायणाचे भक्त असलेल्या नारदमुनींची पूरक भूमिका होती. धर्म-अधर्म यांच्या लढ्यात धर्माची बाजू परखडपणे घेणारे सनातन प्रभात हे नारदमुनींचेच कार्य करत आहेत, असे म्हणावे लागेल. सनातन प्रभातचा जो ज्ञानसूर्य प्रतिदिन प्रकाशित होतो, त्याच्या किरणांमुळे हिंदु राष्ट्राची चळवळ तेजोमय होत आहे, तसेच अनेकांचे जीवनही उजळून निघत आहे. त्याविषयी सनातन प्रभातप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. (९.४.२०२३)
– श्री. सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती, गोवा.