सातारा जिल्हा काळी-पिवळी टॅक्सी, जीप आणि टुरिस्ट, वाहतूक संघटना यांची १७ एप्रिलला उपोषणाची चेतावणी !
सातारा, १५ एप्रिल (वार्ता.) – येथील जिल्हा काळी-पिवळी टॅक्सी, जीप आणि टुरिस्ट, वाहतूक संघटनेने शासनाच्या प्रवासी वाहतुकीविषयी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात वाहनांसह १७ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषण करणार असल्याची चेतावणी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, महिलांना राज्यशासनाने एस्.टी.मधून प्रवास करतांना ५० टक्के सवलत दिली आहे. कोरोनाकाळात प्रवासी वाहतूक करणारी काळी-पिवळी टॅक्सी, जीप पूर्णपणे बंद स्थितीत होती. त्यानंतर भीतीने प्रवासी वाहनात बसत नव्हते. त्यामुळे खासगी वाहन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. सध्याची स्थिती आणि शासनाने २० वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांचे स्क्रॅप ऑर्डरचे आदेश दिल्याने उपविभागीय परिवहन अधिकारी यावर कार्यवाही करण्याच्या सिद्धतेत आहेत. त्यामुळे सध्या परवानाधारक वाहनांचे पासिंग बंद आहे. शासनाच्या निर्णयावर कठोर कार्यवाही झाल्यानंतर वाहन व्यावसायिकांच्या बेरोजगारीत वाढ होणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व दायित्व पूर्ण करण्यासाठी प्रवासी वाहतूक व्यवसाय करणार्या अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या महिलांना एस्.टी. प्रवासात ५० टक्के सवलत आणि स्क्रॅप ऑर्डर धोरणाच्या विरोधात जिल्ह्यातील काळी-पिवळी टॅक्सी, जीप आणि टुरिस्ट, वाहतूक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषण करणार आहेत.