आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या पदवीविषयी शंका उपस्थित करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष भ्रष्टाचारमुक्त करावा !
भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा चारित्र्यसंपन्न, राष्ट्र-धर्माभिमानी शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्रच हवे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी माहितीच्या अधिकाराखाली मागवणारे देहलीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने फटकारले. देशाला सर्वस्व अर्पण करणारे आणि स्वकार्यकाळात अनेक देशहितार्थ उपक्रमांनी देशाची प्रगती करवून घेऊन जगात त्याची मान उंचावणारे मोदी यांची पदवी पहायला मागणारे मोदीद्वेषी अरविंद केजरीवाल हे स्वतः उच्चशिक्षित असून किती भ्रष्ट आणि देशद्रोह्यांना पाठिंबा देणारे आहेत, हे या लेखातून लक्षात येईल !
१. लाकडाच्या फटीत अडकलेली पाचर काढतांना माकडाची शेपटी त्यात अडकण्याची कथा प्रसिद्ध !
माकड हा प्राणी नको त्या चाळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच माकडांच्या चाळ्यांना माकडचेष्टा असे म्हणतात. माकडांचे असे चाळे इतरांसाठी जसे विध्वंसक असतात, तसेच ते त्याला स्वतःलाही अनेकदा संकटात टाकतात. सुताराने अर्धवट कापलेल्या लाकडाच्या फटीत अडकवलेली पाचर (खुंटी घट्ट बसवण्याकरता लावलेली लाकडाची पट्टी) काढण्याच्या खुटीउपाड (खोचक) चाळ्यामुळे त्या फटीत शेपटी अडकवून घेणार्या माकडाची कथा प्रसिद्ध आहे. ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे नुकताच गुजरात उच्च न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात दिलेला एक निर्णय.
२. मोदी यांची पदवी माहितीच्या अधिकारात मागवण्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून चपराक !
माहिती अधिकाराच्या कायद्याच्या अंतर्गत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र यांची माहिती मागवली होती. मुख्य माहिती अधिकार्यांनीही पंतप्रधानाच्या कार्यालयाचे माहिती अधिकारी, गुजरात विद्यापीठ आणि देहली विद्यापीठ यांच्या माहिती अधिकार्यांना मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयीच्या पदव्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. पुढे हे सूत्र गुजरात उच्च न्यायालयात गेले. त्यावर नुकताच उच्च न्यायालयाने निर्णय दिला. हा निर्णय देतांना माहिती अधिकारांतर्गत लोकांच्या खासगी आयुष्यात घुसखोरी करणे योग्य नसून पंतप्रधान मोदी यांची पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र यांची माहिती सादर करण्याची आवश्यकता नाही, असा आदेश न्यायालयाने पारित केला. एवढेच नव्हे, तर न्यायालयाने केजरीवाल यांना थोडा थोडका नव्हे, तर तब्बल २५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला.
३. माकडाच्या हातात कोलीत !
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे भारतीय जनतेच्या हातात माहिती अधिकाराचे प्रभावी अस्त्र आले आहे; पण अस्त्र असो कि शस्त्र, ते विवेकी लोकांच्या हातातच पडायला पाहिजे. ते अविवेकी अथवा माकडाच्या हातात पडले की, विध्वंस होणारच. माहिती अधिकाराच्या कायद्याने शासन आणि प्रशासन यांतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड झाली असली, तरी अन् या कायद्याने भ्रष्ट पुढारी आणि अधिकारी यांच्यावर वचक बसला असला, तरी या कायद्याचा दुरुपयोग करून काही जणांनी त्यांचे उखळ पांढरे करून घेतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. या कायद्याद्वारे काही जणांनी प्रशासनाला विनाकारण त्रस्तही केले आहे. केजरीवालांचे प्रकरण हेही याच वर्गवारीतील आहे. माकडांच्या हातात कोलीत पडले की, असे होणारच. माकडाविषयी एक सुभाषित प्रसिद्ध आहे. आधीच मर्कट, तशातच मद्य प्याला । झाला तशातही वृश्चिकदंश त्याला । झाली तद्नंतर भूतबाधा । मग चेष्टा वदू किती कपिच्या अगाधा । (अर्थ : माकडाने मद्य प्यायले, त्याला विंचू चावला, नंतर भूतबाधा झाली, तर त्याच्या माकडचेष्टा किती आघात होत असतील काय सांगू ?) केजरीवाल यांची वृत्ती आधीच विध्वंसक, त्यात त्यांच्या हातात देहलीच्या मुख्यमंत्रीपदाची आणि पंजाब राज्याची सूत्रे, त्यात मोदी अन् हिंदूंच्या द्वेषाची भर वरून अराजकतावाद्यांशी सख्य. मग त्यांच्या उपद्रवी धंद्यांविषयी काय बोलावे ?
४. पदवी आणि कर्तृत्व यांचा काही संबंध नाही !
बरं, पदवी आणि कर्तृत्व यांचा काही संबंध आहे काय ? आपले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदासस्वामी, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत कबीर, संत तुलसीदास यांच्याजवळ लौकिक अर्थाने कोणत्या पदव्या होत्या ? पण त्यांनी स्वतःचे जीवन आणि साहित्य यांतून दिलेली शिकवण प्रपंच अन् परमार्थ या दोन्ही क्षेत्रांत सारखीच प्रभावी आणि शाश्वत आहे. खानदेशातील संत बहिणाबाई कधी शाळेत गेल्या नव्हत्या; पण त्यांच्या अंतरंगातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या काव्यपंक्ती जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणार्या आहेत. त्यांच्या प्रतिभेला तोड नाही. बरं पदव्या घेतल्या म्हणजेच माणसाच्या जीवनाचे सार्थक होते का ? पदवीधर सुशिक्षित असतो; पण पदवी धारण केल्याने तो सुसंस्कृत होतो का ? आज लाखो पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले पदवीधर असे आहेत की, इतर भाषेत तर सोडून द्या; पण आपल्या मातृभाषेतही चार शुद्ध ओळी लिहू अथवा बोलू शकत नाहीत. अशा पदवीधरांचे काय करायचे ?
५. सुशिक्षितांमध्येच भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक !
सुशिक्षित आणि सुसंस्कृत होणे यांतही पुष्कळ भेद आहे. आज सुशिक्षितामध्येच भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक आहे. आजपर्यंत अनेक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी भरपूर वेतन आणि सोयी-सवलती असूनही भ्रष्टाचाराचे शेण खातांना पकडले गेले आहेत. १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ पर्यंत असणारे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त असणारे टी.एन्. शेषन एकदा म्हणाले होते, भारतातील ९९ टक्के भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी भ्रष्ट आहेत. आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अतोनात वाढले आहे. या सायबर चोरांनी सर्वसामान्यांच्या कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. हे सायबर चोरही सुशिक्षितच आहेत; पण सुसंस्कृत नाहीत. आज भ्रष्टाचार असो कि गुन्हेगारी, प्रदूषण असो कि कचरा, वृद्धाश्रम असो कि अनैतिकता, अनेक सामाजिक समस्या सुशिक्षित लोकांनीच निर्माण केल्या आहेत.
६. साक्षरांपेक्षा सुसंस्कृत श्रेष्ठ !
नुसत्या पदव्यांच्या माळा गळ्यात असून काही लाभ नाही. शिक्षणासमवेत संस्कार आवश्यक असतात. शिक्षण आहे; पण संस्कार नसतील, तर असा माणूस समाज आणि देश यांसाठी घातक असतो. एका संस्कृत सुभाषितात असे म्हटले आहे की, सरस (अर्थात् सुसंस्कृत) असणारा माणूस उलटला, तरी सरसच रहातो; पण साक्षर असलेला माणूस उलटला की राक्षस होतो. तेव्हा उलटून राक्षस होणार्या साक्षरांपेक्षा उलटले, तरी सरस रहाणारेच अधिक हितकारक म्हणावे लागतील.
७. पदवीपेक्षा अनुभव महत्त्वाचा !
नुसत्या पदवीला काहीही अर्थ नसतो. नंतरचा व्यासंग महत्त्वाचा असतो. संगीताची पदवी मिळवली, तरी तो पदवीधर उत्तम गाऊ शकतो, असे नाही. पदवीनंतरचा सराव महत्त्वाचा असतो. तो नसेल, तर पदवी निरर्थक ठरते. आज वाहन चालवण्याचा परवाना कुणालाही मिळतो; म्हणून त्याला व्यवस्थित वाहन चालवता येईल, असे नाही. परवाना प्राप्त झाल्यानंतरही त्याला वाहन चालवण्याचा सराव करावा लागतोच.
८. केजरीवाल यांना दंड झाल्याने नेत्यांना दुःख !
पंतप्रधानांच्या पदवीची माहिती मागवण्याच्या आगाऊपणामुळे केजरीवाल यांना २५ सहस्र रुपयांचा दंड झाला, याचे मनस्वी दुःख महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्यांना झालेले दिसते. ते म्हणाले की, देशातील ज्या तरुणाकडे पदवी आहे, ते आपल्या पदव्या दाखवतात; पण मोदींकडे पदवी मागितली की, २५ सहस्र रुपये दंड होतो. त्यांच्याजवळ अशी कोणती पदवी आहे की, जी पहाण्यासाठी रुपये मोजावे लागतात.
९. मोदी यांचे अफाट कर्तृत्व !
आपण असे गृहित धरू की, नरेंद्र मोदी यांच्याजवळ एकाही विद्यापिठाची पदवी नाही; पण यामुळे देशाचे काय बिघडले ? मोदी यांच्या पूर्वी पंतप्रधान असणारे डॉ. मनमोहन सिंह महान अर्थशास्त्रज्ञ होते; पण काय झाले ? कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले. घोटाळेबाज देशाबाहेर पळून गेले. भारताचे दिवाळे निघाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून एकही घोटाळा झाला नाही. ज्यांनी घोटाळे केले त्यांच्या मालमत्ता जप्त झाल्या. अनेकांची रवानगी कारागृहात करण्यात आली. देशाबाहेर पळून गेलेल्या घोटाळेबाजांना पकडून परत भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) वाढत आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा आर्थिक शक्तीमान देश बनला आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था सर्वांत गतीमान असून झपाट्याने विकास करत असल्याचा अहवाल जागतिक बँकेने नुकताच घोषित केला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात केवळ ५ सहस्र कोटींची अवैध संपत्ती, तर मोदी यांच्या ९ वर्षार्ंच्या कार्यकाळात १ लाख १० सहस्र कोटींची अवैध संपत्ती जप्त करण्यात आली. काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचार करणार्यांवर जेवढ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या, त्याच्या १५ पटींनी अधिक कारवाया मोदी यांच्या कार्यकाळात करण्यात आल्या. मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात केवळ घोषणाच केली नाही, तर ती प्रत्यक्षात कार्यवाहीतही आणली. एकेकाळी भारत हा संरक्षणसामुग्री मोठ्या प्रमाणात आयात करणारा देश होता. आता भारत ही सामग्री निर्यात करू लागला आहे. जगातील अनेक लहान मोठ्या १९ देशांनी डॉलरऐवजी रुपया या भारतीय चलनाला स्वीकृती दिली आहे. सर्वच क्षेत्रांत भारत आत्मनिर्भर होत आहे. पूर्वी गरीब हटले, आता गरिबी हटत आहे. देशी आस्थापने केवळ प्रगतीच करत आहेत असे नाही, तर त्यांनी अनेक विदेशी आस्थापनांना मागे टाकले आहे. अॅमेझॉन, फेसबुक, गुगल, मेटा, वॉलमार्ट ही जागतिक आस्थापने सहस्रो कर्मचार्यांना कामावरून काढत असतांना भारतात मात्र रोजगाराच्या संधी वाढत आहेत.
नरेंद्र मोदींकडे कोणत्याही विद्यापिठाची पदवी नाही, असे आपण पुन्हा एकदा गृहित धरू; पण त्यांचे कर्तृत्व, वक्तृत्व कुणीही नाकारू शकत नाही. ते हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषा तर अस्खलितपणे बोलू शकतातच; पण इतर अनेक भाषांचे जुजबी ज्ञानही त्यांना आहे. त्यांच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी शेकडो विषयांवर जनतेशी संवाद साधून त्यांच्या चौफेर ज्ञानाची प्रचीती दिली आहे. बरं केजरीवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे या तथाकथित अशिक्षित पंतप्रधानांनी भारताची डोकेदुखी आणि काश्मीरला लागू असणारे कलम ३७० (राज्याला विशेष दर्जा देणारे कलम) हटवले. मुसलमान स्त्रियांवर अन्याय करणार्या तलाक (घटस्फोट) या प्रथेवर कायद्याने बंदी आणली. नोटबंदी करून काळा पैसा मातीमोल केला. आतंकवादी आणि नक्षलवादी यांचे कंबरडे मोडले. हिंदूंना अपेक्षित असणारे श्रीराम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून त्याच्यावर जरब बसवली. चीनला सुद्धा भारताचे धाडस दाखवून दिले. जगात भारताची प्रतिमा उंचावली. मॉर्निंग कन्सल्ट या ग्लोबल डिसिजन इंटेलिजन्स फर्मने जगातील लोकप्रिय असणार्या नेत्यांचा सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार जगातील ७६ टक्के लोकांनी मोदी यांना सर्वांत लोकप्रिय नेता म्हणून पसंती दिली आहे. यापूर्वीच्या अनेक सर्वेक्षणांमध्येही मोदी जगामध्ये अव्वल ठरले आहेत. नरेंद्र मोदी लागोपाठ ३ वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि २ वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. भारतीय जनतेने त्यांच्यावर हा विश्वास टाकला तो त्यांच्या पदवीकडे पाहून नव्हे, तर त्यांचे चरित्र आणि चारित्र्य, त्यांच्या देव, देश अन् धर्म यांवरील अतूट निष्ठेकडे पाहून, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची लोककल्याणाची तळमळ, विकासाची दृष्टी याकडे पाहून. कोणत्याही लौकिक पदवीपेक्षा त्यांचे हे कार्य कितीतरी बहुमूल्य आहे.
१०. सुडाचे राजकारण न करता सर्वांसमवेत मैत्री करणारे मोदी !
आपली संकुचित दृष्टी आणि मोदीद्वेष थोडा वेळ बाजूला ठेवून विरोधी पक्षांनीही हे वास्तव मान्य करायला काय हरकत आहे ? विरोधी पक्षांनी त्यांच्या मनाचा एवढा मोठेपणा दाखवायला काहीच हरकत नाही. जगात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या नरेंद्र मोदींवर भाजपविरोधी सर्व पक्षांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे. अशा शिव्यांचा संग्रह केला, तर त्यांचा एक चांगला शब्दकोश निर्माण होईल; पण इतक्या शिव्या खाऊनही हा माणूस शांत आहे. त्यांनी कधी सूडाचे राजकारण केले नाही. सर्वांसमवेत त्यांचा व्यवहार मैत्रीपूर्ण राहिलेला आहे. ही वास्तविकता नुकतीच डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी मान्य केली आहे. मग इतर विरोधी पक्षांनी ती का मान्य करू नये ?
११. भ्रष्टाचारी आणि देशद्रोह्यांना पाठीशी घालणारे केजरीवाल !
ज्या अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर संशय घेतला, ते स्वतः आय.आय.टी.,खडकपूर या नामवंत शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतलेले मेकॅनिकल इंजिनीयर आहेत; पण उच्चविद्याविभूषित असूनही त्यांची वृत्ती मात्र विध्वंसक आणि अराजकवादी आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांचा शिडीसारखा वापर करून आणि मतदारांना वीज, पाणी, प्रवास अशा फुकटच्या सवलती देऊन राजकारणात ते प्रतिष्ठित झाले; पण आता ते स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झाले आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपद यांसारख्या उच्च पदावर अनेक वर्षे राहूनही त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. उलट पदावर असतांना त्यांना जी काही अर्थ आणि सन्मान प्राप्ती झाली, ती त्यांनी देशाला अर्पण केली. केजरीवाल यांच्यावर मात्र भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सध्या कारागृहात आहेत. या मंत्र्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या उत्पादन शुल्क घोटाळ्याचे धागेदोरे केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापर्यंत पोचत असल्याचा आरोप नुकताच भाजपने केला आहे.
आपचे आमदार अमातुल्ला खान यांना लाचखोरी आणि अवैध पिस्तूल बाळगल्याच्या प्रकरणी पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. आपच्या नेत्या निशा सिंह यांना दंगल प्रकरणी चंडीगड न्यायालयाने ७ वर्षार्ंची शिक्षा सुनावली आहे. राम आणि कृष्ण यांची पूजा न करण्याचे आवाहन करणारे आपचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल यांना आपल्या पदाचे त्यागपत्र द्यावे लागले. समाजात अशा प्रकारे विष पेरणार्या अनेकांना केजरीवाल यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. यावरून केजरीवाल यांची वृत्ती किती विकृत आहे, हे दिसून येते. हे तेच केजरीवाल आहेत ज्यांनी जे.एन्.यू. विद्यापिठात भारत तेरे तुकडे होंगे, असे देशद्रोही नारे देणार्या टुकडे गँगचा म्होरक्या कन्हैया कुमारला पाठीशी घातले. शाहीनबाग येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्या देशद्रोह्यांना प्रोत्साहन दिले. आपचे माजी नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांचा खलिस्तानवाद्यांना पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर कुमार विश्वास यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा द्यावी लागली. अरविंद केजरीवाल यांच्याविषयी सारे काही सांगतो म्हटले, तर एक मोठे पुस्तक होईल; पण कोळसा उगाळला तितका काळाच असतो म्हणून इथेच थांबतो.
१२. मोदींवर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या भागातील गंभीर समस्यांकडे लक्ष द्यावे !
अरविंद केजरीवाल त्यांच्या वाह्यात आणि बेलगाम आरोप करण्याच्या स्वभावासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. यापायी त्यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांची क्षमा मागण्याची नामुष्की ओढवली होती. काही दिवसांपूर्वी रजत शर्मा यांनी आपकी अदालतमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घेतलेल्या मुलाखतीचे प्रसारण पहाण्यात आले. त्यात त्यांनी नितीन गडकरी यांना केजरीवाल यांच्याविषयी काही प्रश्न विचारले होते. त्या वेळी रजत शर्मा यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर केजरीवाल यांच्याविषयी आलेला एक मेसेज (निरोप) वाचून दाखवला. त्या मेसेजमध्ये लिहिले होते की, जिंदगी मे सबके लिये तीन काम करना असंभव है । पहिला हत्तीको गोदमे उठाना । दुसरा चिटीको नहलाना । और तिसरा केजरीवालको समझाना । रजत शर्मा यांनी जे काही म्हटले आहे, ते काही खोटे नाही, हे कुणीही मान्य करील. याचा अर्थ पदवीला महत्त्व नाही, असे नाही; पण उच्च पदवीपेक्षा आपला समाज, देश, देव, धर्म यांचे कोण भले करतो ?; देशाला समृद्ध, संपन्न, आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली कोण बनवतो ?; देशासाठी कोण तन, मन, धन अर्पण करतो ?, याला अधिक महत्त्व आहे. तेव्हा केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींच्या पदवीविषयी शंका उपस्थित करण्याचे खुटीउपाड धंदे करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष भ्रष्टाचारमुक्त, देहली प्रदूषणमुक्त, पंजाब अमली पदार्थ आणि खलिस्तानवादी यांच्यापासून मुक्त करून जनतेचे आशीर्वाद प्राप्त करावेत. यातच त्यांचे आणि देशाचे भले आहे.
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ. (१०.४.२०२३)