आर्.बी.एल्. बँकेद्वारे कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप !
कोल्हापूर, १५ एप्रिल (वार्ता.) – आर्.बी.एल्. बँकेने त्यांच्या सी.एस्.आर्. उपक्रम – उमीद १०००च्या अंतर्गत कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप केले. हे वाटप जिल्हा परिषद येथे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आर्.बी.एल्. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर्. सुब्रमण्यकुमार, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, मुलींचे पालक, मुली उपस्थित होत्या. बँक कोल्हापूर, चेन्नई, भाग्यनगर, रायपूर, सिलीगुडी, गुवाहाटी, कोलकाता आणि गोवा यांसह संपूर्ण भारतात १ सहस्रहून
अधिक सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप करत आहे. या प्रसंगी आर्. सुब्रमण्यकुमार म्हणाले, जगभरात, शिक्षण ही मुलींच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. शिक्षणाची सोय करून, तरुण मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यापासून रोखणारे अडथळे आम्ही दूर करू शकतो. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, बँकांना २ टक्के रक्कम ही सी.एस्.आर्.च्या अंतर्गत सामाजिक कार्यासाठी व्यय करावी लागते. आर्.बी.एल्. बँकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. ओडिशा सरकारने १ लाख मुलींना विजेवर चालणार्या दुचाकी देण्याचा निर्णय घेतला आहे.