साधकांनो, व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर सुखलालसा निर्माण करणारी छायाचित्रे ठेवू नका !
काही साधक व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर घरी केलेल्या खमंग खाद्यपदार्थाचे छायाचित्र किंवा कुठे बाहेर फिरायला गेले असतांना तेथील रमणीय दृश्याचे छायाचित्र ठेवतात. अशांना हे लक्षात येत नाही की, ते स्वतः सुखाधीन होण्यासह व्हॉट्सअॅपवर छायाचित्रे ठेवून इतरांनाही सुखाधीन होण्यास उद्युक्त करतात. त्यामुळे अन्य साधकांकडूनही नवनवीन खमंग खाद्यपदार्थ बनवून किंवा बाहेरून आणून खाणे, सेवेतून सुट्टी काढून फिरायला जाणे यांसारख्या मायाप्रधान कृती व्हायला लागतात.
साधकांनो, सध्या तीव्र आपत्काळात अधिकाधिक साधनेकडेच लक्ष देणे हिताचे असल्याने सुखोपभोगांत रममाण करणार्या कृती स्वतः करू नका आणि इतरांनाही त्या करण्यास उद्युक्त करू नका ! इतरांना सुखोपभोगांत रममाण होण्यास उद्युक्त करणार्या कृती करून त्यांना साधनेपासून दूर नेणेे, हे पापच नव्हे का ? व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर इतरांना साधनेसाठी उद्युक्त करणारी अथवा राष्ट्र अन् धर्म यांविषयी जागृती करणारी छायाचित्रे किंवा संदेश ठेवू शकतो.
– पू. संदीप आळशी (५.३.२०२३)