नाशिक पुणे मार्गे मंडणगड एस्.टी. बससेवा कायमस्वरूपी चालू करा !
राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांची मागणी
मंडणगड – नाशिक पुणे मार्गे मंडणगड एस्.टी. बससेवा कायमस्वरूपी संमत करून ती चालू करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री वैभव बहुतूले, संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांनी प्रादेशिक महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हे महत्त्वाचे ठिकाण असून लवकर विकसित होणारा तालुका आहे. मंडणगड येथे नाशिक, पुणे, मंचर, नारायणगाव, भोसरी, सिन्नर, आळेफाटा येथील अनेक नागरिक शिक्षण, निम शासकीय आणि शासकीय नोकरी, व्यवसाय, उद्योग-धंद्यानिमित्त मंडणगड येथे कार्यरत आहेत. मंडणगड येथील नागरिकांना नाशिक, सिन्नर,आळेफाटा, नारायणगाव, मंचर, भोसरी, पुणे येथे येण्या-जाण्यासाठी पुरेशी बससेवा नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.
नाशिक पुणे मंडणगड बससेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्यात आल्यास ओझर येथील विघ्नहर गणपति येथे जाण्यासाठी मोठी सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच एस्.टी. महामंडळाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्येत वाढ होईल.