‘बलात्कार हे राजकीय हत्यार’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटल्याचा पुरावा द्या ! – सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

प्रदेश युवा काँग्रेसच्या सचिवाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर गलिच्छ आरोप केल्याचे प्रकरण

उजवीकडे शिवानी वडेट्टीवार

मुंबई – काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि युवा काँग्रेसच्या प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी ‘बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूंचे प्रेरणास्थान कसे ?’, असा प्रश्‍न उपस्थित करणारा व्हिडिओ प्रसारित केला. हे विधान सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ यातून घेतल्याचे त्यांनी सांगितले. याचा प्रतिवाद करत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर म्हणाले, ‘‘शिवानी वडेट्टीवार यांनी अत्यंत चुकीचे विधान केलेले आहे.

सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात असे कुठलेही वाक्य लिहिलेले नाही. शिवानी यांनी ते वाक्य काढून दाखवावे. ते पुस्तक मी वाचले आहे. सल्लागार सांगतात, तेच त्या बोलतात. त्यांनीही सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. सावरकरांवर केवळ राजकीय हेतूने टीका केली जात आहे. सावरकर हे हिंदुत्वनिष्ठ नेते होते. सध्या देशात किंवा राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आहे. ते सावरकरांच्या विचारांच्या जवळ जाते. विरोधकांच्या हातातून सत्ता गेलेली आहे. आता  ती सत्ता पुन्हा मिळवायची, या राजकीय लाभापोटीच सावरकरांना लक्ष्य केले जात आहे.’’

शिवानी वडेट्टीवार नेमके काय म्हणाल्या ?

हे लोक कुठला मोर्चा काढतात ?, तर ‘सावरकर मोर्चा’ काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात ? सावरकरांचे विचार काय होते ? ‘बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात वापरले पाहिजे’, असे त्यांचे विचार होते. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना कसे सुरक्षित वाटेल? आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक फेरी काढतात.

काँग्रेसची विनाशकाली विपरीत बुद्धी आहे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री

शिवानी वडेट्टीवार यांच्या व्हिडिओवर भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. नेतेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास समजू शकले नाहीत, तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा ठेवणार ? काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी नागपूर येथील गंगा-जमुना वस्तीमध्ये जाऊन देशाच्या संस्कृतीची नाचक्की होईल, अशी वर्तणूक केली. सावकरांविषयी ते असे प्रश्‍न उपस्थित करतांना पाहून राग येतो आणि त्यांची दयाही येते. मला वाटते की, हे म्हणजे काँग्रेसची विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. ही राजकीय आत्महत्या आहे.

संपादकीय भूमिका

ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्यावर अशी गलिच्छ टीका करतांना शिवानी वडेट्टीवार यांना लाज कशी वाटली नाही ? सावरकर यांच्याविषयी बोलण्याची पात्रता नसलेल्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासारखे युवा नेते म्हणजे देशाला लागलेले कलंक आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यातही सावरकरद्वेष असल्यामुळे तेच संस्कार त्यांच्या मुलांवर झालेले असावेत, हे वेगळे सांगायला नको !