देहलीच्या तिहार कारागृहात बंदीवान गुंडांच्या टोळीयुद्धात एका गुंडाचा मृत्यू, तर ४ गुंड घायाळ

हत्या झालेला गुंड प्रिंस तेवतिया (उजवीकडे)

नवी देहली – येथील तिहार कारागृहामध्ये १४ एप्रिलच्या सायंकाळी झालेल्या टोळीयुद्धामध्ये कुख्यात लॉरेंस बिश्‍नोई टोळीचा गुंड प्रिंस तेवतिया याची चाकू भोसकून  हत्या करण्यात आली. अन्य ४ बंदीवान गुंडांवरही चाकूने आक्रमण करण्यात आले. यात ते गंभीररित्या घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे. अतातुर रहमान उपाख्य अत्तवा या गुंडाच्या नेतृत्वाखाली हे आक्रमण करण्यात आले. तो रोहित चौधरी आणि रवि गंगवाल टोळीसाठी गुंडगिरी करतो. या घटनेनंतर आता बिश्‍नोई टोळीकडून प्रत्युत्तर देण्याच्या शक्यताने कारागृहात सतर्कता बागळण्याचा आदेश देण्यात आला आहे. गुंडांनी चमचे आणि थाळी यांद्वारे चाकू बनवला होता. तिहारमध्ये यापूर्वीही अशा प्रकारचे टोळीयुद्धे झालेली आहेत आणि त्यात अनेक बंदीवान गुंडांचा मृत्यू झाला आहे.

आता कारागृहातील ज्या खोली क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली, तेथे ९ मार्च या दिवशी शोधमोहीम राबवण्यात आली होती. तेव्हा बंदीवानांकडून २३ सर्जिकल ब्लेड, अमली पदार्थ, २ भ्रमणभाष आणि प्रतिबंधित साहित्य जमा करण्यात आले होते. (अशा प्रकारचे साहित्य येथे पोचलेच कसे ?- संपादक)

संपादकीय भूमिका

देशातील सर्वांत महत्त्वाच्या कारागृहात सातत्याने अशा घटना घडणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! बाहेर गुंडगिरी करणार्‍यांना पकडून कारागृहात टाकल्यानंतरही ते तेथे अशाच प्रकारची कृत्ये करू शकत असतील, तर कारागृहातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती दयनीय आहे, हेच आपल्या लक्षात येते !