देशभरातील मुसलमान महिलांना मशिदीत नमाजपठण करू द्या ! – पुण्यातील दांपत्याची मागणी
पुणे – मुसलमान महिलांना मशिदीत जाऊन नमाजपठण करता यावे, यासाठी पुण्यातील अन्वर आणि फरहान शेख दांपत्याने गेल्या वर्षी रमजान मासात कायदेशीर लढाई चालू करून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या लढ्याची नोंद घेत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला मशिदींमध्ये महिलांना नमाजपठणाचा अधिकार असल्याचे मान्य करावे लागले. यामुळे गेल्या वर्षीच्या रमजान मासात जिथे महिलांना अटकाव करण्यात आला होता, त्याच बोपोडीतील मशिदीमध्ये यंदा मुसलमान महिला नमाजपठण करतांना दिसत आहेत. याच धर्तीवर देशभरातील सगळ्या महिलांना मशिदीत जाऊन नमाजपठण करू द्यावे, अशी मागणी शेख दांपत्याने केली आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयात लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याने हा पालट पहायला मिळत आहे. मशिदीत प्रवेश मिळाल्याचा येथील मुसलमान महिलांना आनंद तर आहेच; पण देशातील सर्व मशिदींमधे महिलांना असाच प्रवेश दिला जावा, असे या महिलांनी बोलून दाखवले आहे; मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे अजून शेष आहे. तो निकालही महिलांच्या बाजूने येईल आणि देशातील मशिदींमधे मुसलमान महिलांना मुक्त प्रवेश मिळेल, अशी या महिलांची अपेक्षा आहे.(मुसलमान महिलांना स्वतःच्या प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेशासाठी आंदोलन उभे करावे लागते, लढा द्यावा लागतो. हिंदु धर्मात स्त्रियांना आदिशक्तीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते, मंदिरांमध्ये मुक्त प्रवेश दिला जातो. असे असूनही काही पुरो(अधो)गामी हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान असल्याचा खोटा प्रचार करतात. – संपादक)