वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी (पुणे) शहर असुरक्षित !
पिंपरी – गेल्या काही दिवसांमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे शहर असुरक्षित बनले आहे. जानेवारी ते मार्च या ३ मासांच्या कालावधीत शहरात १४ हत्या, ६९ बलात्कार, ९३ लूटमार आणि ४० दंग्याच्या घटना घडल्या. (पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता आलेख पहाता तेथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊनही गुन्हेगारीमध्ये वाढच होत आहे. पोलीस अधिकार्यांनी हे लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात. – संपादक) या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या व्यतिरिक्त हत्येचा प्रयत्न करणे, कोयत्याने वार करणे, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र दाखवून दहशत पसरवणे, भर रस्त्यात अडवून लूटमार करणे, महिलांची छेडछाड आदी वाढलेल्या प्रकारांमुळे पोलीसयंत्रणेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माथेफिरूंनी भोसरी, वाकड आणि चिखली परिसरांत वाहनांची तोडफोड केली आहे. शहरातील अनेक गुन्हेगार कारागृहातून सुटून आल्यानंतर पुन्हा गुन्हे करतात; मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी पोलीसयंत्रणा कुचकामी ठरत आहे.