हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मेधा-दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. जाणवलेली सूत्रे
१ अ. दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी सर्व साधकांना विविध विषयांचे ज्ञान होणे
१७.३.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात न भूतो न भविष्यति ।, असा दक्षिणामूर्ति यज्ञ झाला. तो एक ज्ञानयज्ञ होता. जसे आदिगुरु शिवाने दक्षिणामूर्तीच्या रूपात सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार यांना आत्मज्ञान दिले. अगदी तशाच प्रकारे आम्हा सर्व साधकांना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अवतारकार्य, आपत्काळ, युद्धाचा स्तर, अग्निदेव, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा संबंध, विष्णुलीला, कालमहात्म्य, हिंदु राष्ट्राची स्थापना, अशा सर्व विषयांचे ज्ञान या यज्ञाच्या माध्यमातून प्राप्त झाले. आम्ही या ज्ञानाच्या आनंदसागरात अक्षरशः डुंबून गेलो.
१ आ. परात्पर गुरु डॉक्टर ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग यांना साधकांना विष्णुलीला आणि गुरुलीला सांगण्यास सांगत आहेत, असे वाटणे
६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग सूत्रसंचालन करत असतांना ते सनातनच्या तिन्ही गुरूंशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी) एकरूप झाले आहेत, असे जाणवले. प.पू. भक्तराज महाराज जिज्ञासूंसमोर परात्पर गुरु डॉक्टर यांनाच बोलायला सांगायचे, तसेच गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) श्री. विनायक शानभाग यांना विष्णुलीला आणि गुरुलीला साधकांना सांगण्यास सांगत आहेत, असे मला वाटत होते.
२. अनुभूती
२ अ. यज्ञाच्या वेळी आवाहन केल्यावर सर्व देवतांचे आगमन झाल्याचे दिसणे आणि सप्तर्षि, देवता अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली असल्याचे दिसणे
यज्ञामध्ये भगवान शिव, भगवान विष्णु, गणपति, दक्षिणामूर्ति, देवीमाता, सप्तर्षि आणि परात्पर गुरु डॉक्टर यांना आवाहन करण्यात आले. तेव्हा प्रत्येक देवतेचे तिथे सूक्ष्मातून आगमन झाले असल्याचे मला दिसले. सर्वांत प्रथम गुरुदेवांचे आगमन झाले. त्यानंतर एकेक देवतेचे आगमन होत होते. तेव्हा गुरुदेव त्या देवतांना भावपूर्ण नमस्कार करत होते, असे मला दिसले. सर्वांचे आवाहन झाल्यानंतर सप्तर्षि, देवता आणि गुरुदेव यांच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि सर्व देवता या यज्ञाचा आनंद घेत आहेत, असे मला दिसले.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे मुखमंडल सुवर्णासारखे पिवळ्या रंगाचे होणे
यज्ञाला आरंभ झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मुखावर सुवर्णमयी प्रकाश दिसू लागला. त्यांचे मुखमंडल सुवर्णासारखे पिवळ्या रंगाचे झाले, असे मला जाणवले. नंतर सूत्रसंचालन करतांना विनायकदादा यांनी हीच गोष्ट साधकांना सांगितली. तेव्हा मला याविषयी गुरुदेवांनी आधीच सुचवले होते, याची जाणीव झाली.
२ इ. यज्ञाच्या वेळी गुरुकृपेमुळे ३ घंटे भावावस्थेेत बसू शकणे
यज्ञ चालू झाला, तेव्हा माझ्या मनात आज मी या यज्ञात किती वेळ भावावस्थेत राहू शकतो ? या यज्ञाशी एकरूप होऊन निर्विचार स्थितीत किती वेळ बसू शकतो ?, हे पाहूया, असा विचार आला. तेव्हा या यज्ञाच्या वेळी मी गुरुकृपेमुळे ३ घंटे भावावस्थेेत बसू शकलो. ही माझ्या जीवनातील सर्वार्ंत मोठी अनुभूती आहे. माझ्यावर गुरुकृपेचा वर्षाव होत आहे, याची ही अलौकिक अनुभूती मला गुरुकृपेमुळेच घेता आली. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२ ई. प्रभु श्रीरामचंद्रांप्रमाणे जे साधक सर्व परिस्थितीवर मात करून शेवटपर्यंत गुरुदेवांच्या समवेत रहातील, त्यांना गुरुदेव निश्चितच वैकुंठाला घेऊन जातील, याची प्रचीती येणे
विनायकदादा यांनी सांगितले, गुरुदेवांच्या समवेत आता जे साधक आहेत, त्यांनाच अवतारी कार्यासाठी निवडले आहे किंवा त्यांनाच संधी मिळणार आहे. हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. गुरुदेव आम्हा सर्व साधकांना निश्चितच वैकुंठधामात घेऊन जातील, याची आज पुन्हा एकदा प्रचीती आली.
या वेळी श्री. विनायकदादाही म्हणालेे, गुरुदेव आम्हा सर्वांना निश्चितपणे मोक्षापर्यंत घेऊन जातील. तेव्हा मला पुढील दृश्य दिसले, श्रीरामचंद्रांच्या अवतार-समाप्तीची वेळ आली, तेव्हा अयोध्येतील सर्व प्रजाजनांना त्यांनी आपल्या समवेत वैकुंठाला नेले. त्याच प्रकारे जे साधक सर्व परिस्थितीवर मात करून शेवटपर्यंत गुरुदेवांच्या समवेत रहातील, त्यांना गुरुदेव निश्चितच वैकुंठात घेऊन जातील, याची आज मला प्रचीती आली.
या अज्ञानी जिवाला पवित्र यज्ञामध्ये सहभागी करून घेतले आणि गुरुदेवांनी आपल्या अस्तित्वाची अनुभूती दिली, यासाठी मी त्यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. हे जीवन केवळ त्यांच्या चरणांच्या प्राप्तीसाठी समर्पित व्हावे, अशी मी प्रार्थना करतो.
– गुरुसेवक
श्री. चेतन गाडी, भाग्यनगर, आंध्रप्रदेश. (२०.३.२०२३)
|