सेवेची तळमळ आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी (वय ८० वर्षे) !
श्री. देवदत्त कुलकर्णीआजोबा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा करणार्या साधकांतील सर्वांत वयस्कर साधक आहेत. प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला त्यांच्याकडून शिकण्याची आणि त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळत आहे. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. गुरुदेवांचा प्रत्यक्ष सहवास लाभला असूनही त्याविषयी अहं नसणे
मी कुलकर्णी आजोबांना साहाय्य करण्यासाठी गेल्यावर ते मला त्यांना आलेल्या अनुभूतींविषयी सांगतात. ते मला प.पू. गुरुदेवांनी त्यांना कसे घडवले ?, याविषयी सांगतात. ते मला एकाग्रतेने आणि भावपूर्ण सूत्रे सांगतात. आजोबांचा गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांना गुरुदेवांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे, तरीही त्यांना त्याविषयी अहंकार नाही किंवा त्यांचा इतरांना शिकवण्याचा भाग नाही.
२. सेवेची तळमळ आणि कृतज्ञताभाव
आजोबा मला म्हणतात, सेवा केली नाही, तर मला माझ्या दिनचर्येतील काहीतरी राहिल्यासारखे वाटते. गुरुदेवांच्या कृपेने मला सेवा करण्याची संधी मिळत आहे, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
३. व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे करणे
आजोबा व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे करतात. ते मला सांगतात, देवाला व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे केलेले आवडतात. ते सेवा करतांना स्वयंसूचना सत्रे करतात. त्यांच्यामुळे माझी स्वयंसूचना सत्रांची संख्या वाढली आहे.
परम पूज्य, तुमच्या कृपेनेच मला कुलकर्णीआजोबांचा सत्संग मिळत आहे. त्यांच्याकडून साधनेविषयी शिकायला मिळत आहे, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
– कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ११ वर्षे), फोंडा, गोवा. (९.३.२०२३)