सातारा शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची निवेदनाद्वारे मागणी
सातारा, १४ एप्रिल (वार्ता. ) – शहरातील गोडोली जलाशयात (तळ्यात) हिंदवी स्वराज्य संवर्धक तथा स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयजराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
येथील ‘जलमंदिर पॅलेस’मध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयजराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी नगराध्यक्ष मनोज शेंडे, सामाजिक कार्यकर्ते संग्राम बर्गे, सागर साळुंखे, ‘धर्मवीर युवा मंच’चे प्रशांत नलवडे, बजरंग दलाचे रविकुमार कोठाळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख सतीशबापू ओतारी आणि सर्वश्री अजिंक्य गुजर, शुभम शिंदे, राहुल इंगवले, सचिन जाधव, विजयसिंह बर्गे आणि धारकरी उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, कराड येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे, तसेच भव्य स्मारक सातारा येथे व्हावे. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सध्या बंद आहे. हे काम लवकरात लवकर चालू करावे. शिवतीर्थावर २४ घंट्यांसाठी पोलीस किंवा गृहरक्षक दलाचे सैनिक यांची नेमणूक करण्यात यावी. ज्या छत्रपती शाहू महाराज यांनी सातारानगरी वसवली, मराठा साम्राज्य अटकेपार नेले आणि देहलीवर भगवी पताका फडकवली त्यांचीही भव्य मूर्ती अन् भव्य स्मारक अजिंक्यतारा गडावर उभारण्यात यावे.
स्मारकांसाठी निधी अल्प पडू देणार नाही ! – छत्रपती उदयनराजे भोसलेखासदार श्रीमंत छत्रपती उदयजराजे भोसले यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीसाठी सूचना दिल्या. १५ दिवसांत शिवतीर्थावरील काम चालू करण्यास सांगितले. प्रतिष्ठानने सुचवलेल्या स्मारकांविषयी निधी अल्प पडू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. |