गुंडगिरीचा सोक्षमोक्ष !
उत्तरप्रदेश मधील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद हा १३ एप्रिल या दिवशी पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्या समवेत गुलाम नावाचा गुंडही मारला गेला. ही सर्वांत मोठी बातमी ठरली; कारण हे दोघेही उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी होते; पण ते पसार असल्याने त्यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. या दोघांकडून चकमकीच्या वेळी विदेशी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली. या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वच स्तरांवर चर्चा चालू आहे. काही जणांनी या गोळीबाराचे समर्थन केलेे आहे. उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानून प्रशासन न्याय देत आहे. जे होत आहे, ते चांगले होत आहे. देवाने जे केले, ते चांगले केले, असे म्हटले, तर उमेश पाल यांची आई शांतीदेवी यांनीही पोलीस आणि सरकार यांच्या कामाचे कौतुक केले. असे असले, तरी उमेश पाल यांचे कुटुंबीय अजूनही भीतीच्या छायेत वावरत आहेत, हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यासाठी त्यांनाही सुरक्षिततेची निश्चिती सरकारकडून मिळायला हवी. चकमकीचे वृत्त समजताच अतिक अहमद मुर्दाबाद, उमेश पाल झिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. एखाद्या हत्याकांडातील गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा झाली, तरच पीडितांना न्याय मिळेल.
उमेश यांच्या हत्याकांडानंतर असद आणि गुलाम हे दोघेही भ्रमणभाष अन् सीमकार्ड पालटत होते. त्यामुळे विशेष कृती दलाने (स्पेशल टास्क फोर्सने) ४ सहस्र ४०० सीमकार्ड ट्रॅक केली. ९ राज्यांत धाडी घातल्या. ६०० संशयितांची चौकशी केली. त्या दोघांना आश्रय देणार्या ७ जणांना अटक केली. त्यानंतर या दोघांचा ठावठिकाणा लागला. उत्तरप्रदेश पोलिसांनी ज्या तत्परतेने या प्रकरणाचा छडा लावून असदला संपवले, त्यासाठी त्यांना दादच द्यायला हवी. केवळ ४९ दिवसांमध्ये सर्व प्रकारचे प्रयत्न करून उमेश यांना पोलिसांनी खर्या अर्थाने न्याय मिळवून दिला.
आंतरराष्ट्रीय षड्यंत्र !
गोळीबाराच्या घटनेनंतर बनवण्यात आलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटले की, लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आय.एस्.आय.) यांच्याशी अतिक अहमद याचे थेट संबंध आहेत. शस्त्रास्त्रांची न्यूनता कधीच भासली नसल्याचेही अतिक याचे विधान त्यात आहे. ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये पाडली जाणारी शस्त्रे अतिकपर्यंत पोचवण्याची अंतर्गत व्यवस्था केली जायची. त्यामुळे त्याच्याकडे विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे आगारच होते. असद आणि गुलाम यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली शस्त्रेही अत्यंत घातक होती. गुन्हेगारांकडे इतकी अत्याधुनिक आणि घातक शस्त्रे सापडणे यावरूनच त्यांचे हात कुठवर पोचलेले असतील, याची कल्पना येते. गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अबू सालेम याने असद याला लपण्यासाठी साहाय्य केल्याचीही चर्चा आहे. अशा प्रकारे भारताला सातत्याने अशांत ठेवणे आणि शेवटी त्याचे इस्लामीस्तानात रूपांतर करणे, हेच यांचे यामागील सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. अतिकच्या माध्यमातून या षड्यंत्रातील काही पैलूच समोर आले आहेत; पण अधिक अन्वेषण केल्यावर भारतद्वेष यात किती मोठ्या प्रमाणात मुरलेला आहे, याचा उलगडा होऊ शकतो. असदच्या चकमकीतून अतिक अहमद याचे गुंडाराज नेस्तनाबूत करण्यात पोलिसांना यश मिळाले. सर्वच ठिकाणी असणारी कुख्यात गुंडांची मोठमोठी साम्राज्ये अशी उद्ध्वस्त करायला हवीत.
साम्राज्यवादाला उतरती कळा !
अतिक अहमद हा वर्ष १९७९ पासून गुंडगिरी करत आहे. अनेक गुन्हे करूनही तो गेली ४४ वर्षे उजळ माथ्याने सर्वत्र वावरत होता. अनेकांच्या भूमींवर त्याने दादागिरी करून नियंत्रण मिळवले. त्याची संपर्कयंत्रणाही शक्तीशाली असल्याने त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्याचे आजवर कुणाचेही धारिष्ट्य झाले नाही. प्रत्येक जण त्याला मान द्यायचा. त्याला कुणी विरोध केल्यास तो बक्कळ पैसा देऊन त्यांची तोंडे गप्प करत असे. स्वतःच्या मुलाला राजकारणात उतरवायचे होते; म्हणून असदच्या हस्ते त्याने उमेश पाल यांची हत्या घडवून आणली. यातून असदचे मोठे प्रस्थ निर्माण व्हावे, हा त्याचा हेतू होता. अतिकला ५ मुले आहेत. त्यांतील २ मुले कारागृहात आहेत, २ अल्पवयीन मुले बालसुधारगृहात आहेत. पत्नी फरार आहे, तर असद आता ठार झाला. एकूणच काय, तर संपूर्ण कुटुंबाचे हात गुन्हे करण्यात बरबटलेले आहेत. इतके गुन्हे करून व्यक्ती वरपर्यंत पोचलेली असतांना मुलगा चकमकीत ठार झाल्यावर अश्रू अनावर होऊन ढसाढसा रडण्याला काय म्हणावे ? गेली ४४ वर्षे प्रतिदिन चालणारी ही गुंडगिरी असदला ठार केल्यानंतर काही प्रमाणात संपली, असे म्हणता येईल. जोवर अतिक अहमदला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्याच्या अत्याचारांची शिकार झालेल्या जनतेला न्याय मिळणार नाही. अतिकच्या गुन्ह्यांचा चढता आलेख पहाता त्याच्या खांद्यांवर आतापर्यंत कुणाकुणाचे पाठिंब्याचे हात असतील, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. अशांचा माज उतवरणे, त्यांना वेळीच कठोर शिक्षा करणे आणि न्यायदान घडवून आणणे ही आदर्श न्यायप्रणाली देशात अस्तित्वात असायला हवी. असदला ठार केल्यावर मानवतावाद्यांना त्याचा पुळका आलाच. त्यामुळे या चकमकीला त्यांनी विरोध केला; पण हाच मानवतावाद उमेश पाल यांच्या हत्या प्रकरणाच्या वेळी कुठे गेला होता ?, याचे उत्तर ते देतील का ? गुंडांनी अराजक माजवायचे आणि जनतेने ते निमूटपणे सोसत रहायचे, ही कुठली आली लोकशाही ? गुंडांचा साम्राज्यवाद निर्माण होऊ न देता सर्वत्र कायदा-सुव्यवस्था राखली जाईल, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. भाग्यनगर येथील दिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना चकमकीत ठार करण्यात आले. कुख्यात गुंड विकास दुबे हाही चकमकीत ठार झाला. आता तिसरा क्रमांक असदचा होता. गुन्हे घडतच रहातात; पण त्यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस, सरकार आणि न्यायालये यांनी आपापल्या स्तरावर कृतीशील होऊन पीडितांना न्याय मिळवून द्यावा, ही अपेक्षा !
गुंडांचे साम्राज्य उद्ध्वस्त करून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे अपेक्षित ! |