पू. सौरभ जोशी यांचा लघुसंदेश प्राप्त होऊन त्यांचे सूक्ष्मातून मार्गदर्शन मिळाल्याने मनातील नकारात्मकता नष्ट होणे

पू. सौरभ जोशी

१. एका प्रसंगात आई-वडिलांच्या संदर्भात ‘पूर्वग्रह’ हा दोष उफाळून येणे आणि त्याविषयी मानस क्षमायाचना अन् प्रार्थना करून रात्री झोपणे

अधिवक्त्या प्रीती पाटील

‘२१.४.२०२० या दिवशी एका प्रसंगात मी माझ्या आई-वडिलांशी उद्धटपणे बोलले. ‘माझ्याकडून या स्वभावदोषावर अजूनही प्रयत्न होत नाहीत’, याची मला तीव्रतेने जाणीव होऊन पुष्कळ वाईट वाटत होते. मला त्यांच्याविषयी असणार्‍या पूर्वग्रहावर मात करता येत नव्हती. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना आणि क्षमायाचना करण्याचा दिवसभर प्रयत्न करत होते; पण माझ्या चुकीमुळे घरात निर्माण झालेला दाब न्यून होत नव्हता. रात्री झोपतांना मी आई – वडिलांची मानस क्षमा मागितली आणि गुरुमाऊलीला आर्ततेने प्रार्थना केली.

२. सकाळी भ्रमणध्वनीत पू. सौरभ जोशी यांचा लघुसंदेश प्राप्त झाल्याचे दिसणे आणि त्यांचे छायाचित्र पहातांना त्यांनी सूक्ष्मातून व्यष्टी साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणे

दुसर्‍या दिवशी सकाळी मी उठल्यानंतर भ्रमणभाष पाहिला. तेव्हा पू. सौरभदादांनी (पू. सौरभ जोशी यांनी) मला लघुसंदेश पाठवल्याचे दिसले. (पू. सौरभ जोशी यांचे वडील श्री. संजय जोशी यांनी तो संदेश पाठवला होता.) तो संदेश पाहून ‘आदल्या दिवशीचा प्रसंग गुरुमाऊलीच्या चरणी पोचला’, याची मला जाणीव झाली. पू. दादांचे छायाचित्र पाहिले. त्या वेळी ते माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. ‘काळजी करू नकोस. केवळ कृतीला भावाची जोड दे. प्रसंगावर मात करण्यासाठी बुद्धीने निश्चय करून प्रयत्न कर. हा कोरोनाच्या कालावधीतील दळणवळणबंदीचा (‘लॉक डाऊन’चा) कालखंड म्हणजे श्रींनी आपल्याला व्यष्टी साधनेची घडी पक्की करण्यासाठी दिलेली अमूल्य संधी आहे. साधनेत आल्यापासून जे शक्य झाले नाही, ते आता या कालावधीत साध्य करायचे आहे आणि श्रींचा संकल्प असल्यामुळेच हे शक्य होणार आहे,’ असे ते सांगत असल्याचे मला जाणवले.

३. पू. सौरभ जोशी आणि गुरुमाऊली यांच्या कृपेमुळे पूर्वग्रहामुळे निर्माण झालेली मनातील नकारात्मकता नष्ट होऊन उत्साह जाणवणे 

त्यानंतर माझ्या मनातील नकारात्मकता नष्ट होऊन मला नव्याने उत्साह जाणवला. एका क्षणात ही स्थिती पालटल्याचे मला जाणवले. ‘कुटुंबियांविषयी असलेला पूर्वग्रहासारखा प्रबळ दोष न्यून करणे, ही गोष्ट माझ्यासाठी अशक्यप्राय होती; परंतु पू. दादा आणि गुरुमाऊली यांच्या कृपेमुळे ते सहज सोपे झाले’, याची मला अंतरात जाणीव झाली. ‘माझ्यासारख्या क्षुद्र जिवाचा उद्धार व्हावा’, यासाठी अहोरात्र काळजी घेणारी माझी गुरुमाऊली आणि पू. सौरभदादा यांच्या चरणी अनन्य शरणागत भावाने कृतज्ञता व्यक्त करते.’

– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (२३.४.२०२०)

४. संकलन करणार्‍या साधिकेने मनाच्या नकारात्मक स्थितीत कुटुंबियांची मानस क्षमायाचना केल्यावर मनावरील ताण न्यून होऊन तिला हलकेपणा जाणवणे

‘ही अनुभूती संकलन करतांना माझ्या मनाची स्थितीही साधिकेप्रमाणेच होती. त्या वेळी साधिकेप्रमाणे मीही गुरुमाऊलींच्या समोर कुटुंबियांची मानस क्षमायाचना केली. त्या वेळी मनावरील ताण न्यून होऊन मला हलकेपणा जाणवला.

‘हे गुरुदेवा, प्रत्येक वेळी संकलन सेवेच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासमवेत राहून मला मार्गदर्शन करता आणि माझ्याकडून साधना करवून घेता’, यासाठी तुमच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक