राज्यात मागील ३ वर्षांत बाललैंगिक अत्याचाराच्या २१ सहस्र ३८७ गुन्ह्यांची नोंद !
बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होणे म्हणजे गुन्हेगार कायद्याला जुमानत नसल्याचे लक्षण !
प्रतीकाताम्क चित्र
बीड – जिल्ह्यात दुर्गम धामणदरी (तालुका बार्शीटाकळी) गावातील शाळेत शिकणार्या ९ ते १० वर्षांच्या ४ मुलींवर शाळेतील २ शिक्षकांनी अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या शिक्षकांवर गुन्हे नोंद झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेसमवेतच राज्यात सरासरी प्रतिदिन २० अल्पवयीन मुली अशा विविध घटनांत लैंगिक अत्याचाराच्या शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या ‘सी.सी.टी.एन्.एस्.’ (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम) अहवालातून समोर आली आहे. वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ या ३ वर्षांत राज्यात घडलेल्या अशा घटनांचा आलेख सतत वाढता असून मागील ३ वर्षांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार २१ सहस्र ३८७ गुन्ह्यांची नोंद पोलिसांत झाली आहे.
बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये अनेकदा परिचितांकडूनच अत्याचार होत असल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. कुटुंबीय असोत किंवा शेजारी, तसेच ओळखीचे लोक हे अल्पवयीन चिमुकल्या मुलींच्या ओळखीचा अपलाभ घेऊन पैसे, चॉकलेट यांचे आमीष दाखवून अत्याचार करतात, तर किशोरवयीन मुलींना अनेकदा विवाहाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याचे प्रकार घडले आहेत. ही आकडेवारी पहाता राज्यातील बाललैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत.
संपादकीय भूमिकाबालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठीचा ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२’ असूनही अशा गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होणे म्हणजे कायद्याचे भय नसल्याचेच द्योतक, तसेच गुन्हेगारांना कायद्यानुसार त्वरित कठोर शिक्षा न दिल्याचा परिणाम आहे. |