छत्रपती संभाजीनगर येथील वारसास्थळांवरील सर्व अतिक्रमणे हटवणार !
नवखंडा पॅलेस
छत्रपती संभाजीनगर – राज्य पुरातत्व विभाग शहरातील ऐतिहासिक स्मारके, वारसास्थळांवरील अतिक्रमणे हटवणार आहे. यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासनासह ही ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमणे हटवली जातील, अशी माहिती राज्य पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी दिली. राज्य पुरातत्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत १० ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळे येतात. या स्थळांवर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. ही अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. (ही अतिक्रमणे होण्यासाठी उत्तरदायींवरही कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)
विभागाने मकई प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया चालू केली आहे. या संदर्भात महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून हे अतिक्रमण हटवण्याची कारवाई चालू करत आहे. याच पद्धतीने देहली गेट, भडकल गेट, पाणचक्की, नवखंडा पॅलेस, लाल मशीद, काळी मशीद, चौक मशीद आणि शहागंज मशीद येथील अतिक्रमणे हटवणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेशी चर्चा केली जात आहे, अशी माहिती गोटे यांनी दिली.