आदर्श महिला पोलीस !
भाग्यनगर (आंध्रप्रदेश)मध्ये परीक्षा केंद्रांवर भ्रमणभाष नेण्यास अनुमती नसल्याने महिला हवालदाराने थेट पोलीस आयुक्तांनाच रोखले. परीक्षा केंद्रांची सुरक्षाव्यवस्था पहाण्यासाठी पोलीस आयुक्त आले असता त्यांना महिला पोलीस हवालदार के. कल्पना यांनी ‘येथे भ्रमणभाष नेण्यास अनुमती नसून तो इथे जमा करा’, असे सांगितले. महत्त्वाचे म्हणजे आयुक्तांनीही स्वतःचा भ्रमणभाष लगेच जमा केला आणि पोलीस कर्मचार्यांना ‘अशाच प्रकारे सतर्क रहात प्रामाणिकपणे स्वतःचे कर्तव्य पार पाडा’, असे सांगून त्यांना शाबासकी म्हणून ५०० रुपये बक्षीसही दिले. येथे स्वतःची चूक प्रांजळपणे स्वीकारून संबंधितांचे याविषयी कौतुक करणे, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असून भावनिक स्तरावर न रहाता केलेल्या दोघांच्या कृती अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहेत. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा चालू असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्तव्यावर असतांना अशा प्रकारे योग्य कृती करणारे पोलीसदलात किती जण आहेत ? हे पहाणे महत्त्वाचे आहे. कोणताही भेदभाव न करता नि:पक्षपणे स्वतःचे कर्तव्य पार पाडणार्या महिला पोलिसांचा आदर्श सर्वत्रच्या पोलिसांनी घेतल्यास पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास नक्कीच साहाय्य होईल ! तसेच हा आदर्श महिलांनीही घेणे आवश्यक आहे. सध्या महिलांवर अनेक अत्याचार होत आहेत. हे थांबवण्यासाठी महिलांनीही अशाच प्रकारे स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे.
गुन्हेगारी आणि अराजकता रोखणे, हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. पोलीससेवेचा हेतू न्याय्य आणि खंबीरपणे कायद्याचे पालन करणे, हा आहे. गेल्या काही दिवसांतील पोलीसयंत्रणेच्या संदर्भातील बातम्या वाचून महाराष्ट्रातील पोलीसयंत्रणेचे झपाट्याने आणि खोलवर होत असलेले अध:पतन अधोरेखित होत आहे. पोलीसयंत्रणा ही सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. या यंत्रणेलाच जर अपप्रकारांची कीड लागली, तर भविष्यात गुन्हेगारी अनियंत्रित होऊन समाजव्यवस्था धोक्यात येऊ शकते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी स्वार्थी हेतूने राजकीय हिताला प्राधान्य न देता, जागे होत समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन पोलीसयंत्रणेच्या शुद्धीकरणाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. पोलीसयंत्रणेत अशा प्रकारच्या सुधारणा घडवून आणत पोलीसयंत्रणा अधिकाधिक पारदर्शक केल्यास पोलिसांची प्रतिमा नक्कीच सुधारेल !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे