२२ एप्रिलला श्री परशुराम जयंतीच्या निमित्त भव्य शोभायात्रा ! – अधिवक्ता विवेक शुक्ल, अध्यक्ष, ब्राह्मण सभा करवीर
कोल्हापूर, १३ एप्रिल (वार्ता.) – २२ एप्रिलला श्री परशुराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोल्हापुरातील सर्व ज्ञाती संस्थांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा दुपारी ४ वाजता पेटाळा, न्यू हायस्कूल येथून प्रारंभ होईल. महाद्वार रोड, श्री महालक्ष्मी मंदिर, ताराबाई रोड, तटाकडील तालीम, वरुणतीर्थ वेस आणि गांधी मैदान मार्गे परत पेटाळा येथे समारोप होईल. या शोभायात्रेत श्री परशुरामाची प्रतिमा, श्रींच्या पादुका, ढोल पथक, लेझीम पथक, दुचाकी स्वार यांचा समावेश असेल. या शोभायात्रेनंतर सायंकाळी ७ वाजता श्रींचा जन्मोत्सव पाळणा होणार आहे. तरी अधिकाधिक ज्ञाती बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष अधिवक्ता विवेक शुक्ल यांनी केले आहे.
१. या शोभायात्रेत समाजातील ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय, क्रीडा, संत अशा विविध क्षेत्रांत योगदान दिलेल्या व्यक्तींची आठवण करून देणारी व्यक्तीचित्रे आणि वेषभूषा साकारण्यात येणार आहे. या सोहळ्याचा शुभारंभ करवीरपिठाचे शंकराचार्य जगद्गुरु श्रीमद् विद्यानृसिंहभारती यांच्या हस्ते होणार आहे.
२. समाजाच्या धार्मिक, आध्यात्मिक, मानसिक उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करणारा घटक म्हणजे पुरोहित होय. पुरोहित संघाच्या वतीने वृक्षारोपण, पंचगंगा घाट स्वच्छता, स्मशानभूमीला लाकूड आणि शेणीदान, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार यांसह अनेक उपक्रम राबवले आहेत. देशसेवा केलेल्या सैनिकांच्या कल्याण योजनेसाठी साहाय्य, त्यांच्या पाल्यांसाठी संस्कार शिबिरे यांसह अनेक उपक्रम राबवले आहेत.
समाजातील सर्व स्तरांमधील मुलांमध्ये संस्कार रूजण्यासाठी संस्कारवर्ग घेतले जातात. तरी पशुराम जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्ताने निघणार्या शोभायात्रेत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने करण्यात आले आहे.