बांधकाम ढासळत असूनही श्रीरामनिर्मित बाणगंगा तलावाच्या दुरुस्तीला पुरातत्व विभागाची अनुमती मिळेना !
मुंबई, १३ एप्रिल (वार्ता.) – ‘प्रभु श्रीराम यांनी बाण मारून निर्माण केलेली गंगा’ असा पौराणिक इतिहास असलेल्या प्राचीन बाणगंगेच्या तलावाचे बांधकाम ढासळले आहे. असे असतांना राज्य पुरातत्व विभागाकडून तलावाच्या दुरुस्तीला अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. मागील ४ मासांपासून या तलावाचा विकास आराखडा संमतीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे रखडला आहे.
‘गौड सारस्वत ब्राह्मण टेंम्पल ट्रस्ट’च्या मालकीची असलेल्या बाणगंगा तलावाची राज्य पुरातत्व विभागाकडे प्राचीन संरक्षित स्मारक म्हणून नोंद आहे. त्यामुळे तलावाच्या विकासकामांसाठी पुरातत्व विभाग आणि राज्यशासन यांची अनुमती आवश्यक आहे. राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र वैभव स्मारक संगोपन योजने’च्या माध्यमातून बाणगंगा तलाव १० वर्षांच्या संगोपनासाठी मिळावा, यासाठी गौड सारस्वत ब्राह्मण टेंम्पल ट्रस्टने राज्यशासन आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्याकडे अर्ज केला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून तलावाच्या विकासासाठी १२ कोटी रुपये संमतही करण्यात आले आहेत. देवस्थानकडून विकासकामासाठी १ कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहेत.
या विकास आराखड्यातून बाणगंगेच्या पायर्या दुरुस्त करणे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, प्रकाश व्यवस्था, परिसरात रस्ते करणे आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. ही कामे २ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महानगरपालिका आणि गौड सारस्वत ब्राह्मण टेंम्पल ट्रस्ट यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे; मात्र विकास आराखड्यासाठी पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार यांकडून संमती न मिळाल्यामुळे हे काम रखडले आहे.
संपादकीय भूमिकाश्रीरामाने निर्मिलेल्या बाणगंगा तलावाच्या दुरुस्तीला अनुमती न देणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा ! |