गायनाच्या कार्यक्रमांमध्ये गायक गाण्याऐवजी ओठांची केवळ हालचाल करतात ! – गायक पलाश सेन यांचा दावा
मुंबई – सध्याचे गायक सभागृहांतील कार्यक्रमांमध्ये गाण्याऐवजी केवळ ओठांची हालचाल करतात आणि पार्श्वभूमीवर त्या गाण्याची ध्वनीफीत लावतात, असा दावा गायक पलाश सेन यांनी एका मुलाखतीमध्ये केला. यासह त्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरून आयोजित करण्यात येणारे ‘रिअॅलिटी शो’ (स्पर्धात्मक कार्यक्रम) ठरवून केलेले असतात, त्यांची संहिता सिद्ध असते, असाही दावा केला आहे.
Singer Palash Sen opens up about fake live performances!https://t.co/vEXsL2UK17
— BombayTimes (@bombaytimes) April 11, 2023
१. पलाश सेन यांनी एका विदेशी गायिकेचे उदारहण देतांना सांगितले की, तिच्या गीतांच्या कार्यक्रमांना गर्दी होत असे; पण ती थेट गात नसून केवळ ओठांची हालचाल करते, हे प्रेक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला अंडी फेकून मारली होती. भारतातील ९९ टक्के गायक असेच करतात. मी त्यांची नावे सांगणार नाही; पण हे दुदैवी आहे. हे जगभरात होत आहे. प्रेक्षकांची दिशाभूल करणारे हे गायक स्वतःशीच प्रामाणिक नाहीत. यापेक्षा अधिक काय बोलणार ?
‘रिअॅलिटी शो’ खोटे असतात !
पलाश सेन पुढे म्हणाले की, मी ‘रिअॅलिटी शो’ही केले; पण याचा मला पश्चात्ताप होतो. तेथे संहितेनुसार, म्हणजे ठरवून होत असते. हे सगळे ‘रिअॅलिटी शो’ खोटे असतात. रिअॅलिटीच्या नावावर तिथे काहीच रिअॅलिटी (सत्यता) नसते. या शोमध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. तो केवळ एक टीव्ही शो असून तो ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेसारखा पहायला हवा. एक ‘रिअॅलिटी शो’मध्ये पर्यवेक्षक म्हणून काम पहात असतांना माझा दलेर मेहंदी यांच्याशी वाद झाला. ते संहितेप्रमाणे बोलत होते, तर मी खरे वागण्याचा प्रयत्न करत होतो.