पुरुषांनी उभे रहाण्याऐवजी बसून लघवी करणे लाभदायी ! – विदेशी तज्ज्ञ


न्यूयॉर्क – पुरुष अनेकदा उभे राहून लघवी करतांना दिसतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येही पुरुषांना उभे राहून लघवी करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. विदेशातील तज्ञांच्या मते पुरुषांना बसून लघवी करणे अधिक लाभदायी आहे.

१. नेदरलँड्समधील डॉक्टर्सना असे आढळून आले आहे की, लघवी करण्यासाठी बसणे पुरुषांसाठी, विशेषत: ज्यांना प्रोस्टेटची समस्या आहे, त्यांच्यासाठी पुष्कळ लाभदायी ठरू शकते; कारण उभे रहाण्याऐवजी बसून लघवी अधिक जोराने बाहेर पडते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही उभे राहून लघवी करत असाल, तर त्यामुळे तुमच्या ओटीपोटाचे आणि मणक्याचे स्नायू आकुंचन पावतात. जेव्हा लोक बसतात, तेव्हा ते ओटीपोटाच्या स्नायूंना आराम देतात. यामुळे लघवी करणे सोपे होते.

२. कॅलिफोर्निया विद्यापिठाच्या ‘युरोलॉजी’ विभागातील प्राध्यापक डॉ. जेसी मिल्स म्हणाले की, ज्यांना दीर्घकाळ उभे रहाण्यात अडचण येते, अशा लोकांसाठी लघवी करण्यासाठी बसणे एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. असे अनेक लोक आहेत ज्यांना असे वाटते की त्यांचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही, म्हणून ते बसून लघवी करतात.

३. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ प्राध्यापक स्टर्गियोस स्टेलियोस डोमोचसिस यांनी म्हटले आहे की, जर तुमचे मूत्राशय योग्यरित्या रिकामे होत नसेल, तर त्यामुळे लघवी टिकून रहाते (युरिनरी रिटेंशन) आणि त्यामुळे संसर्ग किंवा मूत्राशयात खडा होऊ शकतो. त्याच्या लक्षणामध्ये लघवीचा वेग मंद होणे, लघवी करतांना ताण येणे, लघवीला वेळ लागणे इत्यादींचा समावेश होतो.