बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या निविदेच्या अटी आणि शर्ती २ सप्ताहांमध्ये निश्चित करू ! – महापालिका प्रशासन

पुणे – वेताळ टेकडीवरील ‘बालभारती’ ते पौड फाटा असा २५० कोटी रुपयांच्या नवीन रस्त्याला ‘महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेने’ने विरोध केला आहे. तरी या प्रकल्पाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. येत्या २ सप्ताहांमध्ये निविदेसाठी अटी आणि शर्ती निश्चित करण्याचे काम पूर्ण होईल, असे महापालिका प्रशासनाने घोषित केले आहे.

या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. विविध मार्गांनी आंदोलन करत हा प्रकल्प रहित करण्याची मागणीही केली जात आहे. या प्रकल्पामुळे विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक अल्प होणार नाही. केवळ १२ टक्के वाहतूक कोंडी सुटेल. या रस्त्यामुळे पैशांचा अपव्यय, पर्यावरणाचा र्‍हास होणार आहे. त्यापेक्षा या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी ‘मनसे जनाधिकार सेने’चे हेमंत संभूस यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे माजी सभागृहनेते नीलेश निकम म्हणाले की, वर्ष १९९७ पासून या प्रकल्पाचा पाठपुरावा चालू आहे. २५ मिनिटांचा प्रवास अवघ्या ३ मिनिटांमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे इंधन, वेळ, पैसा यांची बचत होईल; परंतु पंचवटी-सुतारदरा-गोखलेनगर हा बोगदा करू नये. या बोगद्यामुळे पानशेत पूरग्रस्तांची घरे तोडावी लागतील आणि पर्यावरणाचाही र्‍हास होईल.