लोटे येथे ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाच्या कालावधीत गोशाळेतील ६ गायींचा मृत्यू
गोशाळेचे रखडलेले अनुदान आणि जागेचा प्रश्न या प्रमुख मागण्यांसाठी उपोषण
रत्नागिरी – जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थानच्या गोशाळेमध्ये एक महिन्यापासून १८ गायींचा मृत्यू झाला आहे. गोशाळेचे रखडलेले अनुदान आणि जागेचा प्रश्न यांमुळे गोशाळेचे संचालक आणि कीर्तनकार ह.भ.प. भगवान कोकरे महाराज हे उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाला आता ४ दिवस झाले आहेत. या उपोषणाच्या कालावधीत ६ गायींचा मृत्यू झाला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थानच्या या गोशाळेमध्ये ११०० गायी आहेत. वर्ष २००८ मध्ये कसायाकडे जाणार्या गायींना वाचवण्यासाठी, तसेच महामार्गावर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गायींना निवारा देण्यासाठी ही गोशाळा बांधण्यात आली. वर्ष २०१७ मध्ये या गोशाळेसाठी महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्राकडून १ कोटी रुपयांचा निधी संमत झाला.
गेल्या ४ वर्षांपासून संमत झालेल्या निधीपैकी उर्वरित २५ लाख रुपये शासनाकडून अद्याप गोशाळेला मिळालेले नाहीत. त्यामुळे गायींच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे या गोशाळेतील गायींवर उपासमारीची वेळ आली आहे. गोशाळेचे रखडलेले अनुदान मिळावे , गोशाळेच्या जागेच्या प्रश्नiसाठी हे उपोषण चालू आहे.
दुसरीकडे शासनाच्या पशूसंवर्धन विभागाकडून या गोशाळेविषयी आक्षेप घेण्यात आले आहेत. त्या संदर्भात शासनाकडून नोटीसही गोशाळेला देण्यात आली आहे.
या नोटिसीवर खुलासा करतांना भगवान कोकरे महाराज म्हणाले की,
१. पशूसंवर्धन विभागाचा हा अहवाल खोटा असून १ कोटी रुपयांच्या रकमेत साधी स्मशानभूमी बांधली जात नाही. मी ११०० गायींच्या निवार्याची व्यवस्था केली आहे. मी कोणतीही माहिती लपवलेली नाही
२. मी शासनाच्या सर्व नियम आणि अटींची पूर्तता करून गोशाळा चालवत आहे. गोशाळेतील गायी बंदिस्त गोठा पद्धतीने सांभाळतो. हिरवा चारा पुरेसा नसल्यामुळे मी त्यांना चरण्यासाठी रानात सोडतो; पण माझ्या गायी उनाड नाहीत. कुणाच्या शेतात जाऊन शेतीची हानी होऊ नये, यासाठी माझे कामगार गायींच्या पाठीमागे असतात.
३. या गायींना उपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन वेळेवर केले जाते.
४. माझ्या गोशाळेकडे स्वतःच्या मालकीची जागा नाही; पण कोळकेवाडी आणि अन्य ठिकाणी माझ्याकडे भाडे करार पद्धतीने जी जागा आहे. ती मी पशूसंवर्धन विभागाला दाखवली आहे. शासनानेच मला या गोशाळेसाठी उपयोगिता प्रमाणपत्र दिले आहे.