शासकीय कामकाजात मराठीच्या अधिकाधिक वापरासाठी राज्यशासन धोरण निश्चित करणार !
मुंबई – शिक्षण, तसेच शासकीय कामकाज यांमध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी ‘मराठी भाषा सल्लागार समिती’ची मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत १२ एप्रिल या दिवशी ऑनलाईन बैठक पार पडली. यामध्ये मराठी भाषेचे संवर्धन आणि तिचा अधिकाधिक वापर करण्याविषयी सर्वंकष धोरण लवकरच घोषित करण्याचे निश्चित करण्यात आले.
मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, तसेच भाषेचा शिक्षणात व शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री @dvkesarkar यांनी भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.#मराठीभाषा pic.twitter.com/IzyqpEkdJ8
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 12, 2023
या बैठकीत मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, तसेच अन्य सदस्य, भाषा संचालक श्रीमती विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांच्यासह संबंधित अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते. प्रस्तावित मराठी भाषा भवनाचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. वाई येथील प्रस्तावित मराठी विश्वकोष मंडळाची इमारत, तसेच मराठी भाषा विभागाद्वारे राबवण्यात येणारे विविध उपक्रम यांविषयी या बैठकीत चर्चा झाली.