आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सावरकरवाड्यात मांडली जाणार वीरगाथा !

मुंबई – स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या भगूर (नाशिक) येथील जन्मस्थानी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तेजस्वी इतिहास मांडला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे.

याविषयी १२ एप्रिल या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे सुधीर मुनगंटीवार यांनी बोलावलेल्या बैठकीला पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर, चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आदी उपस्थित होते.

 सावरकरवाड्यातून जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा संदेश दिला जावा ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भगूर येथील त्यांचा घरात केला. हे स्मारक आणि या वाड्याच्या भिंती केवळ माती विटांच्या न रहाता त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा संदेश दिला जावा. तंत्रज्ञानाचा संपूर्ण वापर करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास नव्या पिढीला दाखवावा. भगूर या गावात प्रवेश करताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट समोर यावा, असे काम करण्याची सूचना या वेळी मुनगंटीवार यांनी अधिकार्‍यांना दिली.