नृत्य आणि गायन स्पर्धा कार्यक्रमांची जाणवलेली विदारक स्थिती अन् त्याचा स्पर्धकांवर होणारा परिणाम आणि त्यासाठी असलेली साधनेची आवश्यकता !
‘भारतीय संगीत’ ही ईश्वराने मानवाला दिलेली एक ‘दैवी देणगी’ आहे. कलेचा मूळ उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हा आहे. स्वतःचा अहंकार त्यागून ईश्वराच्या अखंड अनुसंधानात राहून कलेतून ईश्वराची अखंड अनुभूती घेता येणे, म्हणजेच ‘कलेतून ईश्वरप्राप्ती साधणे’, असे म्हणता येईल. सध्याच्या गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांच्या स्थितीचा अभ्यास केल्यास आताच्या नवोदित कलाकारांची कलेतून भौतिक सुख मिळवणे, विविध स्पर्धांत सहभागी होऊन प्रसिद्धी मिळवणे, स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व निर्माण करणे अन् इतरांच्या समवेत स्पर्धा करणे, अशीच मानसिकता दिसते. याला एक कारण म्हणजे विविध कार्यक्रमांची (रिॲलिटी शोज्ची) आलेली लाट होय.
सध्या होणारे काही कार्यक्रम माझ्या पहाण्यात आले. यातील काही परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलेला दिलेला विक्षिप्त प्रतिसाद, स्पर्धकांचे केलेले अवास्तव कौतुक, परीक्षक आणि पालक यांची स्पर्धात्मक मानसिकता हे पाहून माझे मन उदास झाले. कला स्पर्धामय करून तिच्या मूळ ‘ईश्वरप्राप्ती’ या उद्देशापासून आपण कित्येक कोस दूर जात असल्याचे जाणवले. या कार्यक्रमामध्ये परीक्षकांच्या होणार्या विक्षिप्त कृतींची काही उदाहरणे, त्यातून परीक्षकांची दिसणारी विदारक स्थिती, त्यांच्या अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारी चुकीची दिशा यातील काही भाग ७ एप्रिल या दिवशी पाहिला. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.
३. नृत्य आणि गायन स्पर्धेतील स्पर्धकांसंबंधी परीक्षक अन् पालक यांची अयोग्य मानसिकता
३ अ. बालवयात मुलांना अश्लील गाण्यांवर नाचवल्याने लहान वयात नको त्या भावना निर्माण होत असूनही त्याचे परीक्षक आणि पालक यांना अयोग्य न वाटणे : ६ – ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलांना मोठ्यांप्रमाणे गाण्यास अथवा नृत्य करण्यास प्रेरित केले जाते, उदा. मुन्नी बदनाम हुई… (एका चित्रपटातील आयटम गाणे – अश्लील हावभाव करत तंग कपडे घालून केलेले नृत्य) एवढ्या लहान वयात त्यांना अशा गाण्यांवर नृत्य करायला शिक्षकांसह अगदी पालकही प्रोत्साहित करतात. तसेच दर्शक आणि परीक्षक यांना त्यांचे कौतुक वाटते.
(‘ज्या वयात मुले चांगले विचार ग्रहण करून घडतात, त्यांच्यावर अशा नाच-गाण्यांमुळे विपरीत परिणाम होईल. भावी पिढीवर चांगले संस्कार घडल्यासच राष्ट्राचे भवितव्य घडणार आहे. याचा परीक्षक, तसेच पालक यांनी विचार केल्यास भावी पिढीही चांगली सुसंस्कारीत होईल.’ – संकलक)
३ आ. स्पर्धकाचे अनावश्यक कौतुक करणे : ‘एखाद्याने चांगले नृत्य सादर केले असेल, तर परीक्षक त्या स्पर्धकाचे अनावश्यक कौतुक करतात. एका कार्यक्रमात परीक्षक पुढील प्रकारे अनावश्यक आणि अवास्तव कौतुक करतांना दिसले आहेत. ‘आजपर्यंत अशा प्रकारचे सादरीकरण कुणीच केले नाही. यापेक्षा याची दुसरी चांगली पद्धत (Version) असूच शकत नाही किंवा तुम्ही अमुक एका मोठ्या कलाकारालाही हरवले असते’ इत्यादी.
असे अनेक कार्यक्रमांत निदर्शनास आले आहे.
(‘अशा प्रकारच्या अवास्तव कौतुकाने स्पर्धकाचा अहं वाढून त्याची पुढील कला शिकण्याची जिज्ञासा संपुष्टात येऊन त्याच्या कलासाधनेची हानी होऊ शकते.’ – संकलक)
४. भारतीय शास्त्रीय नृत्यापेक्षा पाश्चात्त्य प्रकारांकडे अधिक कल असणे, तसेच भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करणार्या कलाकारांनी भारतीय आणि पाश्चात्त्य प्रकारांचे एकत्रीकरण करणे
आजकाल मूळ भारतीय शास्त्रीय नृत्य सादरीकरण करणारे अत्यल्प आढळतात. सर्व युवा पिढी पाश्चात्त्य नृत्याकडे (उदा. हिप-हॉप (Hip-Hop), काँटेम्पररी (Contemporary), ब्रेक डान्स (Break Dance), रोबोटिक डान्स (Robotic), लिरीकल डान्स (Lyrical Dance कडे) वळलेली आढळते. कार्यक्रमात शुद्ध भारतीय शास्त्रीय नृत्य न करता ‘फ्यूझन’ म्हणजे भारतीय आणि पाश्चात्त्य प्रकारांचे एकत्रीकरण केलेले आढळते, उदा. शास्त्रीय नृत्यात एखादा पाश्चात्त्य तालावर (बीटवर) म्हणजे ‘रॅप’ (पाश्चात्त्य गायन प्रकार) टाकतात, भरतनाट्यम् करतांना सर्व मुद्रा आणि हालचाली ‘ब्रेकडान्स’प्रमाणे करतात इत्यादी.’ (क्रमशः)
– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.५.२०२१)