जालियनवाला बागेतील नृशंस हत्याकांड !
आज ‘जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिन’ आहे. त्या निमित्ताने…
१३ एप्रिल १९१९ या दिवशी पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराच्या शेजारी जालियनवाला बागेत जनरल डायर याने सहस्रो निरपराधी आबालवृद्धांची हत्या केली.
त्या वेळी ‘रौलट ॲक्ट’ला विरोध करण्यासाठी मोहनदास गांधी यांची सत्याग्रह आंदोलन जोरात चालू होते आणि त्याला विरोध करण्याचा अट्टहास ब्रिटीश राजसत्ता बेमालूमपणे करत होती. त्यामध्ये अमृतसरच्या लोकांचे हाल चालू झाले. ‘जालियनवाला बागेत सभा आहे. लाला कन्हैय्यालाल हे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत’, असे घोषित करण्यात आले. ब्रिटिशांच्या गुप्त पोलिसांशी सख्य असणार्या हंसराज नावाच्या गृहस्थाने सभेची सिद्धता चालू केली. सभेस सहस्रो लोक आले. सभेच्या ठिकाणावरून विमान घिरट्या घालू लागताच हंसराजने सभास्थान न सोडण्याविषयी श्रोत्यांना सांगितले आणि गुप्त पोलिसांना खुणा केल्या. थोड्याच वेळात ब्रिटीश पोलिसांनी बागेच्या तोंडाशी वेढा दिला. गोळीबार चालू होण्यापूर्वीच हंसराज व्यासपिठावरून खाली उतरला आणि पसार झाला. इतर लोक घाबरून भिंतीवरून उड्या टाकत पळू लागणार इतक्यात गोळीबार चालू झाला. सभास्थानाला एकच दार होते आणि तेथून पोलिसांचा गोळीबार चालू होता. असंख्य लोक घायाळ, तर अनेकांचा मृत्यू झाला. या हत्याकांडात ७ मासांपासून ७० वर्षांपर्यंतची सर्व वयाची माणसे, साधू आणि स्त्रियाही होत्या. या गोळीबारात जितक्या अधिक माणसांची हत्या करता येईल तितकी करण्याचा जनरल डायरचा निश्चय होता. गोळीबारप्रसंगी भूमीवर लोळण घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न माणसे करू लागली, तेव्हा खाली बसून गोळ्या झाडण्याचा हुकूम सुटला ! शेवटी गोळ्या संपल्या, तेव्हा हत्या सत्र थांबले आणि डायर निघून गेला.
बागेत रात्री प्रेतांचा खच पडला होता. असंख्य घायाळ झाले होते. त्यांची विल्हेवाट लावणे शक्य नव्हते; कारण रात्री ८ वाजण्याच्या नंतर घराबाहेर पडणार्यास गोळी घातली जाईल, असा हुकूम होता. त्यामुळे केवळ पाणी वेळेवर मिळाले नाही, म्हणूनही शेकडो लोकांचे प्राण गेले.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)