राज्यातील ७५ धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणार बेल उद्यानाची निर्मिती !
मुंबई, १२ एप्रिल (वार्ता.) – राज्यातील ७५ धार्मिक स्थानांच्या ठिकाणी ‘बेल वन उद्यान’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाच्या वनविभागाने घेतला आहे. नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यशासनाकडून याविषयी घोषणा करण्यात आली होती.
बेल वृक्षाची पाने, मुळे, फळे आणि साल यांचा विविध रोगांवरील उपचारांसाठी उपयोग केला जातो. बहुपयोगी असलेल्या या बेलवृक्षांची संख्या झपाट्याने न्यून होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाच्या निमित्ताने धार्मिक स्थळी बेल वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उद्यानांमध्ये सीता अशोक, रूद्राक्ष, बोर, पळस, पारिजात, पांढरा चाफा, पांढरी कण्हेर, पांढरा धोतरा आणि स्वस्तिक या वृक्षांचीही लागवड केली जाणार आहे.